Monday, June 22, 2026
MAHARASHTRA

मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘अँटीजेन टेस्ट’चा वापर करा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

सोलापूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

सोलापूर, दि. २४ : कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या ‘अँटीजेन टेस्ट’चा वापर करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांचा विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,  आरोग्य संचालक नंदकुमार देशमुख, कोविड टास्क गटांचे प्रमुख डॉ.दिलीप कदम आदी उपस्थित होते.

महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील कोरोना बाबतची सविस्तर माहिती दिली. शहरातील दाट वस्तीच्या आणि लोकसंख्येच्या भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या.

शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागातील  नागरिकांची ‘अँटीजेन टेस्ट’ करा. या चाचणीमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे अर्ध्या तासात कळते. त्यामुळे बाधा झालेल्या पण लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना वेगळे काढता येईल आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल, असे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.  शहरातील एकूण 15 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्राच्या अखत्यारित मृत्यूदर जास्त आहेत. या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आता जादा लक्ष दिले जाईल, असे श्री.म्हैसेकर यांनी सांगितले. त्यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्याच्याही सूचना दिल्या.

खाजगी दवाखान्यात नियंत्रित दरानेच आकारणी केली जाते का यावर लक्ष द्या. डॅशबोर्डवर कोरोना बाधित, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षात ठेवलेले रुग्ण अथवा मृत्यू झालेले रुग्णांची माहिती अचूक करा, अशा सूचनाही .म्हैसेकर यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading