Friday, May 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यसभेप्रमाणेच अन्य रिक्त जागांवर राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

 

मुंबई प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेबरोबरच पक्ष संघटनेतील रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदांवर जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून त्यासाठी अनेक जण सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. विधानपरिषदेप्रमाणेच या पदांवर उमेदवारांची निवड करणे हे पक्ष नेत्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या तब्बल 75 एवढी होती. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश होता. मात्र, पक्षांतर्गत नाराजी टाळण्याबरोबरच युवक, अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व, मुंबईतील आश्वासक तरुण चेहरा या दृष्टीने सुनेत्रा पवार यांनी झिशान सिद्दिकी यांची निवड करून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे कौशल्य दाखवले.

मात्र सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या नावांचा भरणा असल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पकाळातच सुनेत्रा पवार यांच्यासमोर पुन्हा तेच आव्हान उभे राहिले आहे. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, आनंद परांजपे, समीर भुजबळ, नवाब मलिक, विक्रम काकडे, अविनाश आदिक यांचा राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये प्रमुख समावेश आहे.

सुरज चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक अध्यक्ष पद दीर्घकाळ रिक्त आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला अध्यक्षपद आणि महिला आघाडी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांपासून ही दोन्ही पदे रिक्त आहेत. राज्यसभा उमेदवारीपाठोपाठ या पदांवरही नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading