शुक्रवारी भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅलीचे आयोजन
पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, ऐतिहासिक भिडे वाड्यापासून सुरू होणाऱ्या रॅलीचा समारोप पुणे महानगरपालिकेत होणार आहे. त्या नंतर महापालिकेत अभिरूप सभा होणार असल्याची माहिती उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली.
सत्यशोधक रॅलीला दुपारी दोन वाजता भिडे वाडा येथे संविधान पूजनाने प्रारंभ होईल. त्यानंतर अभिरूप महात्मा फुले पारंपरिक बग्गीत विराजमान होतील. भिडे वाडा येथून अप्पा बळवंत चौक मार्गे ही रॅली पुणे महानगरपालिकेत दाखल होईल. तेथे अभिरूप फुले यांचे स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शंभरहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत.
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिरूप महात्मा फुले पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या नवीन सभागृहात अभिरूप सभेला सुरुवात होईल. यावेळी महापौर मंजुषाताई नागपुरे अभिरूप महात्मा फुले यांचे स्वागत करतील. या सभेला महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, नगरसेवक आणि पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे महानगरपालिकेत आयुक्त आणि नगरसेवक म्हणून सात वर्षे काम केले होते. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याचा गौरव करण्याबरोबरच सत्यशोधक विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अभिरूप सभा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत काही निमंत्रित नागरिक उपस्थित राहणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.
