तालचक्र युवा महोत्सवाच्या पाचव्या वर्षात युवा कलाकारांच्या प्रतिभेचा त्रिवेणी संगम
कथक, सरोद, तबला आणि गजलगायनाने रंगल्या सुरेल मैफली
पुणे : युवा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पद्मश्री पं. विजय घाटे प्रस्तुत तालचक्र युवा महोत्सवाने यंदा पाच वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय महोत्सवात कथक नृत्य, सरोदवादन, तबलावादन आणि गजलगायन अशा विविध कलाविष्कारांनी रसिकांना सांगीतिक मेजवानी अनुभवायला मिळाली. युवा कलाकारांच्या तयारीच्या आणि दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
शिवाजीनगर येथील बीएमसीसी रस्त्यावरील सारथी सभागृहात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी हा महोत्सव झाला. महोत्सवात युवा कथक नृत्यांगना श्रीजा बिश्वास, सरोदवादक इंद्रायुध मुजुमदार, तबलावादक हेमंत जोशी आणि गायक हिमांशु दरमोरा यांनी कला सादर केली. रसिकांसाठी महोत्सवात विनामूल्य प्रवेश होता.
महोत्सवाची सुरुवात बनारस घराण्याच्या युवा कथक नृत्यांगना श्रीजा बिश्वास यांच्या एकल नृत्याने झाली. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कालीस्तुती सादर करत देवीचे उग्र, वीर आणि दैत्यसंहारक रूप प्रभावीपणे उभे केले. त्यानंतर तीनतालातील पारंपरिक बंदिशी, उठान, टुकडे, तिहाई, परण आणि गिनती यांतून कथकच्या तांत्रिक अंगाचे दर्शन घडवले. शिवाच्या आनंद तांडवाचे चित्रण करणाऱ्या ‘डिमिक डिमिक डमरू कर बाजे, प्रेममगन नाचे भोला’ या रचनेतून त्यांनी शिव-पार्वती विवाहाचा आनंददायी प्रसंग साकारला. विदुषी गिरिजादेवी यांचा ‘प्यारा के मोरी गुईया सावरिया’ हा दादरा त्यांच्या अभिनयकौशल्याची प्रचीती देणारा ठरला. पदलालित्य, लयकारी आणि तालावरील प्रभुत्व यामुळे त्यांचे सादरीकरण रंगतदार झाले. त्यांना शंकर मिश्रा (तबला व पढंत), संतोष मिश्रा (गायन व संवादिनी) आणि कल्याणी देशपांडे (सतार) यांनी साथसंगत केली.
पहिल्या दिवसाच्या मैफलीची सांगता युवा सरोदवादक इंद्रायुध मुजुमदार यांच्या वादनाने झाली. पुण्यात वादन करणे आपल्यासाठी नेहमीच आनंददायी असल्याचे सांगत, नुकतेच पिता झालेल्या इंद्रायुध यांनी ही मैफल आपल्या नवजात बाळाला समर्पित केली. त्यांनी राग कौसी कानडा आलाप, जोड आणि झाला या क्रमाने खुलवत तीनतालातील गत सादर केली. द्रुत लयीत घराणेदार लयकारीचे नमुने पेश करत त्यांनी वादनाची रंगत वाढवली. मांज खमाजमधील सादरीकरणाने त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबल्यावर पूरक साथ केली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात युवा तबलावादक हेमंत जोशी यांच्या एकल वादनाने झाली. तीनतालातील सादरीकरणात त्यांनी जोरकसपणा आणि नजाकत यांचा सुरेख मेळ साधला. कायदे, टुकडे, चलन, पेशकार, चक्रधार, रेला आणि अनाघात टुकडे अशा पारंपरिक रचनांमधून त्यांनी तबलावादनातील वैविध्य उलगडले. उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद हबीबुद्दीन खाँ आणि पं. अनोखिलाल मिश्रा यांच्या काही रचनाही त्यांनी सादर केल्या. त्यांना यश खडके यांनी संवादिनीवर लेहरा साथ, तर यश मेस्त्री यांनी टाळांची साथ केली.
महोत्सवाच्या उत्तरार्धात डेहराडून येथील कलाश्रय संस्थेचे अध्यक्ष आणि गायक हिमांशु दरमोरा यांनी गजलगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुण्याच्या सांगीतिक परंपरेचा गौरव करत त्यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या साधनेचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळत राहावी, अशी भावना व्यक्त केली. सुरुवातीला पं. ज्ञानप्रकाश घोष यांनी मेघ रागात बांधलेल्या ‘गगन गरज दमकत दामिनी’ या मध्यलय त्रितालातील आणि ‘घन छाये गगनन घोर’ या द्रुत तीनतालातील बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘तुझे क्या खबर मेरे हमसफर’, ‘कोयी पास आया सबेरे सबेरे’, ‘आ गयी याद शाम ढलतेही’ आणि ‘मेरा जज्बे मुहब्बत कम ना होगा’ अशा आशयघन गजलांनी मैफल अधिक भावपूर्ण केली. त्यांना निशीथ गंगाणी यांनी तबल्यावर आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ केली.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री पं. विजय घाटे, पं. अतुलकुमार उपाध्ये, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, विलास जावडेकर, लोकमान्य मल्टिपर्पजच्या शाखाधिकारी मानसी कोकीळ, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि नृत्यांगना शीतल कोलवालकर उपस्थित होते. प्रवीण बढेकर आणि विलास जावडेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
