केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५,०५३ पानी दोषारोपपत्र; लोणावळा पोलिसांच्या तपासात कटाचा उलगडा
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, लोणावळा पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५,०५३ पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. सुरुवातीला अपघाताचा प्रकार वाटणाऱ्या या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी आणि चेतनचा मित्र रितेश हांगे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, केतनला संपवण्याचा कट मार्च २०२६पासून रचला जात असल्याचा आरोप आहे. सुरुवातीला त्याची हत्या न करता त्याला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा विचार आरोपींनी केला होता. यासाठी परराज्यातील एका व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, हा व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यास संपूर्ण कट उघड होण्याची भीती असल्याने तो पर्याय नंतर सोडण्यात आला. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींपैकी एक जण सरकारी साक्षीदार झाल्याची माहिती आहे.
तपासात आरोपींनी गुन्ह्याची योजना आखताना विविध माध्यमांचा आधार घेतल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ‘मर्डर’ चित्रपट पाहिला, पोलिसांच्या तपासापासून बचाव करण्यासंदर्भातील पॉडकास्ट ऐकले आणि पुरावे नष्ट करण्याच्या पद्धतींबाबत एआय साधनांचा वापर करून माहिती मिळवली. मेघालयातील चर्चेत आलेल्या ‘सोनम प्रकरणा’चाही त्यांनी अभ्यास केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
केतन आणि सिया यांचे ६ जून रोजी बाली येथे प्री-वेडिंग फोटोशूट होणार होते. मात्र, त्यापूर्वीच केतनचा खून करण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोप आहे. बालीला जाण्याच्या तयारीत असताना सियाने खालापूरमधील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांची बालीची नियोजित यात्रा रद्द झाली.
यानंतर केतनला दरीत ढकलून त्याचा मृत्यू घडवून आणण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आली. यापूर्वी लोहगडावर एका महिलेचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचा आधार घेत केतनचा सेल्फी घेताना तोल जाऊन दरीत पडल्याचा बनाव करता येईल, असा विचार आरोपींनी केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
१४ जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली होती. त्यावेळी तिने त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, त्यात ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर साप आल्याचे सांगून केतनला घाबरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला; परंतु तोही अयशस्वी ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
यानंतर रितेश हांगेने ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यासाठी एका परिचित मुलीचा फोटो वापरण्यात आला. १८ जून रोजी या खात्यावरून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाच्या मैत्रिणीच्या नावाने संवाद साधत सियाचा वाढदिवस सरप्राईज पद्धतीने साजरा करण्यासाठी तिला लोहगडावर घेऊन येण्यास केतनला सांगण्यात आले.
त्यानुसार १८ जून रोजी केतन आणि सिया लोहगडावर पोहोचले. चेतन चौधरी दुसऱ्या मार्गाने किल्ल्यावर पोहोचून मंदिराजवळ थांबला होता. केतनचे लक्ष नसताना सियाने त्याला मागून धक्का दिला आणि चेतननेही त्याला लाथ मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर केतन खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपींनी ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते हटविल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. मात्र, तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड, उपलब्ध छायाचित्रे तसेच पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला. या सर्व पुराव्यांच्या आधारे ५,०५३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
