उत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ता सर्वगुणसंपन्न होतो – महापौर रवी लांडगे
पुणे : अध्यात्म आणि सेवा यांचा संगम करीत तरुणांना एकत्र करून सामाजिक कार्य करण्याचे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केले आहे. उत्सवाचा कार्यकर्ता हा नेता, सामाजिक कार्यकर्ता किंवा उत्तम व्यावसायिक होतो. गणेशोत्सवात तो या सगळ्याशी निगडित असलेले गुण संपादन करीत असतो. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ता सर्वगुणसंपन्न होतो, असे मत पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मोरया गोसावी चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव, उपमहापौर शर्मिला बाबर, आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परीक्षक मंडळ उपस्थित होते.
अमित गोरखे म्हणाले, गणेशोत्सवात जिवंत देखाव्यांची परंपरा ही पूर्वी पुण्यात होती. परंतु आता या स्पर्धेमुळे ती पिंपरी- चिंचवडमध्ये देखील सुरू झाली आहे. आत्ता डीजे प्रथाही अनेक ठिकाणी आहे. त्याचा पायंडा आपण कमी केला पाहिजे. उद्याची चांगली पिढी घडविताना कार्यकर्ता देखील घडला पाहिजे. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ हे कार्यकर्ता निर्मिती करणारा कारखाना आहे.
आमदार हेमंत रासने म्हणाले, सन १८९३ ला समाज संघटित व्हावा, यासाठी घरातील गणपती लोकमान्य टिळकांनी रस्त्यावर आणला. आज १३५ वर्षांनंतर तब्बल १४० देशात हा उत्सव साजरा होत आहे. ही कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे. पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धेत यंदा सुमारे ३०० मंडळ सहभागी झाली. ही विधायक शक्ती समाजातील अनेक कामे करीत आहे. भारत देश २०४७ ला शक्तिशाली होण्यास कार्यकर्त्यांचा देखील मोलाचा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.
* तब्बल १४ लाख २० हजार रुपयांची बक्षिसे
स्पर्धेमध्ये शहरातील २२५ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १८७ मंडळांना १४ लाख २० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. भोसरीतील कै. दामूशेठ गव्हाणे मित्रमंडळास ५१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. पिंपरीतील सुवर्णयुग मित्रमंडळाला द्वितीय क्रमांकाचे ४५ हजार रुपयांचे बक्षीस, भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम भोसले मंडळाला तृतीय क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे बक्षीस, पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी मित्रमंडळाला चौथ्या क्रमांकाचे ३० हजार रुपयांचे बक्षीस, तर आकुर्डीतील काळभोरनगर येथील समता मित्रमंडळाला पाचव्या क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. निगडीतील जय बजरंग तरुण मंडळ, प्राधिकरणातील जय हिंद मित्रमंडळ ट्रस्ट, भोसरीतील लांडगे तालीम मंडळ, पठारे लांडगे तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव येथील गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, एसकेएफ मित्रमंडळ, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ या सात मंडळांना ‘जय गणेश भूषण’ पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
