शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द
ठाणे: प्रतिनिधी
उद्यावर येऊन ठेपलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीची परीक्षा घेण्यात येणार होती. उद्या तब्बल 2 लाख 26 हजार शिक्षक ही परीक्षा देणार होते. मात्र, पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्रात आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करते. हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करते. कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पेपरफुटीबद्दल सरकारला धारेवर धरले.
एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकले तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे. हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे, अशा शब्दात दानवे यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
