‘मुख्यमंत्र्यांबरोबर झाली उच्चस्तरीय चर्चा…’
एकत्र विमान प्रवासाबाबत ठाकरे यांची मिश्किल प्रतिक्रिया
यवतमाळ प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. या प्रवासात काय चर्चा झाली, अशी विचारणा केली असता ठाकरे यांनी त्यावर मिष्कील प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर उच्चस्तरीय चर्चा झाली असून त्यात काय ठरले ते लवकरच कळेल, असे ठाकरे म्हणाले.
एकेकाळी राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केलेली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात परस्परांमध्ये वितुष्ट असलेले नेते बनले आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच या फुटी मागील पडद्यामागचे सूत्रधार असल्याच्या चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकाच विमानातून झालेल्या प्रवासाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, हे आमच्या पक्ष नेतृत्वाच्या मिश्किलपणाचे द्योतक आहे. ऑपरेशन टायगर नंतर झालेला हा एकत्र विमान प्रवास निव्वळ योगायोग आहे. माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही नेत्यांमध्ये प्रवासादरम्यान कोणतीही चर्चा झालेली नाही. विमानातून उतरल्यावर देखील दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले, असा दावा अंधारे यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र ठाकरे यांना डीवचण्याचीं संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे हे प्रत्येक गोष्टीकडे विनोदाने बघतात. त्यामुळेच त्यांची ही अवस्था झाली आहे, असा टोला बन यांनी लगावला. महायुतीमध्ये सध्या कोणतीही नवी समीकरणे जुळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच विमान प्रवासात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
