Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीकडून करण्यात आला सन्मान

पुणे  : पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीतर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या ३४ व्या वार्षिक परिषदेदरम्यान शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला. हॉटेल शेरटन ग्रँड येथे संपन्न झालेल्या या परिषदेत शहरातील स्त्रीरोग क्षेत्रात काम करणाऱ्या इतर डॉक्टरांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांच्या हस्ते यावेळी डॉ. संजय गुप्ते यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता मेहंदळे, अभिनेता ओम भुतकर, पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मनीष म्हात्रे, उपाध्यक्षा डॉ. वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. चित्तरंजन याज्ञिक म्हणाले, “देशामध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्यामुळे मुलींच्या आरोग्याकडे लहानपणापासूनच अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मधुमेह हा काही प्रमाणात अनुवांशिक असला तरी अलीकडच्या काळात त्यामध्ये बदल होत आहेत. जीवनशैलीमध्ये होणाऱ्या बदलामुळे मधुमेहाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या मंडळींनी या समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”

तरुण डॉक्टर मंडळीनी शिकावे आणि मोठे यश मिळवावे असा, सल्ला डॉ. संजय गुप्ते यांनी यावेळी दिला. मधुमेहाच्या वाढत्या समस्येचा विचार करता मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी आहे. आपण आतापर्यंत जे काम करत आलो त्यामध्ये माझे शिक्षक, सहकारी यांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. भविष्यकाळात देखील आपण अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करत राहू, असे डॉ. गुप्ते यावेळी म्हणाले.

आपल्याला डॉक्टरी पेशाबद्दल कायम आदर राहिला असून समाजासाठी ही मंडळी मोठे काम करत असल्याचे अभिनेते ओम भुतकर यावेळी म्हणाले. डॉक्टरांच्या परिषदेमधून नवीन विषय पुढे येत असतात. अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी देखील तशा परिषदा होण्याची आवश्यकता असल्याचे भूतकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading