Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

विजय दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भव्य लष्करी बँड प्रदर्शन

 

पुणे : १९७१ च्या भारत–पाक युद्धातील ऐतिहासिक विजयाची आठवण जपणारा विजय दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज सोमवार, १५ डिसेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील प्रांगणात प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या उपस्थितीत भव्य लष्करी बँडचे (मिलिटरी बँड) सादरीकरण करण्यात आले.

सुवर्णप्रहरी उजळून निघालेल्या विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये लष्करी बँडच्या देशभक्तीपर धुनांमधून १९७१ च्या युद्धातील शौर्य, बलिदान आणि पराक्रमाची गाथा पुन्हा एकदा जिवंत उपस्थितांना अनुभवता आली. तिरंग्याच्या लाटांबरोबरच नादमय ढोल–ताशे आणि बँडच्या सुरांमधून राष्ट्रभक्तीचा अभिमान यावेळी जागविण्यात आला.

या कार्यक्रमातून १९७१ च्या युद्धात देशासाठी निर्भयपणे लढलेल्या वीर जवानांच्या शौर्याची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवत त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार म्हणून विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे , वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके , अधिष्ठाता प्रा. सुप्रिया पाटील ,डॉ. संजय तांबट , विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी, नवोपक्रम नवसाहचार्य नवसंशोधन विभागाचे संचालक प्रा. गोल्हार सर, विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय दिनानिमित्त आयोजित हा लष्करी बँड कार्यक्रम म्हणजे इतिहासाला उजाळा देणारा, राष्ट्राभिमान जागवणारा आणि वीर शहीदांच्या स्मृतींना वंदन करणारा भावस्पर्शी सोहळा ठरला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading