सतार- चेलो सहवादनाने दिली नादसौंदर्याची अनोखी अनुभूती
मिश्रा बंधुंचे रंगतदार सहगायन आणि पं. कशाळकर यांचे स्वरश्रीमंत गायन
‘ताल फरिश्ता’ या उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावरील दिनदर्शिकेचे महोत्सवात झाले लोकार्पण
पुणे : सहगायनातून उलगडलेला राग श्री, सतार आणि चेलो सहवादनाने दिलेली नादसौंदर्याची अनुभूती आणि पं. कशाळकर यांचे स्वरश्रीमंत गायन, यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा पहिला दिवस स्मरणीय झाला.
बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र- शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन पहिल्या संपन्न झाले. आपल्या भावना व्यक्त करताना मिश्रा यांनी काही आठवणी जागवल्या. ‘गेल्या ७० वर्षांपासून या स्वरमंचावर अनेकानेक महान कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. अशा व्यासपीठावर गायन सादर करणे आव्हानात्मक आहे, याची जाणीव आहे. इथे ९ वर्षांनंतर गायनसेवा सादर करण्याचे सौभाग्य मिळाले आहे, असे ते म्हणाले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे श्रीनिवास जोशी यांनीही मिश्रा बंधुंचे वडील आणि काका, पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘हे कलाकार त्यांच्या किशोरवयीन काळापासून स्नेही झाले आहेत. त्यांना या स्वरमंचावर आमंत्रित करणे, आनंदाचे असल्याचे जोशी यांनी नमूद केले.
मिश्रा यांनी समयोचित राग श्री सादर केला. अतिमध्य लयीत झपतालात ‘प्रभू के चरण’, तीनतालातील पारंपरिक बंदिश आणि द्रुत एकतालातील रचनांमधून त्यांनी श्री रागाचे वातावरण उभे केले. सहगायन करताना आवश्यक असणारा परस्पर समन्वय उत्तम असल्याने रसिकांना श्री रागाची संवादी अनुभूती मिळाली. ‘जगत में झूठी देखी प्रीत’ ही गुरूनानकांची रचना गाऊन मिश्रा बंधुंनी सांगता केली. त्यांच्या द्रुत गायनातील तानांचे वैविध्यही उल्लेखनीय होते. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद (तबला), अमेय बिच्चू (हार्मोनिअम) तसेच अक्षय जोशी आणि निषाद व्यास (तानपुरा) यांनी अनुरूप साथसंगत केली.
रसिकांना ज्या सादरीकरणाची सर्वाधिक उत्सुकता होती, त्या पं. रविशंकर यांचे शिष्य पं. शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव- दे-हास यांच्या सतार व चेलो अशा सहवादनाने रसिकांना खिळवून ठेवले. मूळच्या नेदरलँड्सवासीय सास्किया यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताची दीर्घकालीन साधना केली आहे. ‘भारतीय चेलो’ या अद्वितीय वाद्याची निर्मिती करून त्यांनी पूर्व व पश्चिम संगीत परंपरांमध्ये नवे पूल बांधले आहेत. रसिकांशी संवाद साधताना पं. शुभेंद्र राव म्हणाले, “मी या महोत्सवात १९८१ मध्ये गुरुजी पं. रविशंकर यांच्यासोबत तानपुऱ्यावर साथ केली होती. तेव्हा तबल्याची साथ उस्ताद झाकीर हुसैन यांनी केली होती. त्या अविस्मरणीय वादनाचे मला आजही स्मरण आहे. महान कलाकारांमधील सुसंवाद आणि स्नेहबंध कसे असावेत, याचे ते आदर्श होते.”

सतार आणि चेलो सहवादनासाठी या कलाकार जोडप्याने राग हेमंत निवडला होता. मैहर घराण्याचे उस्ताद बाबा अल्लाउद्दीन यांची निर्मिती असणारा हा राग पं. रविशंकर यांनी जगभरात लोकप्रिय केला. हेमंत रागाचे रूप आलाप, जोड, झाला अशा पारंपरिक क्रमाने या कलाकारांनी क्रमाक्रमाने उलगडत नेले. सतारीचे झंकार रसिकांच्या परिचयाचे असले तरी भारतीय चेलो या वाद्याचा नाद रसिकांसाठी अनोखा होता. सास्किया यांनी चेलो या वाद्यातून विविध नादांचा अनुभव दिला. मानवी कंठसंगीताशी जवळीक साधणाऱ्या अनेक टोनल क्वालिटी त्या लीलया वाजवत होत्या. हे नादवैविध्य आणि त्याला लपेटून घेणारे सतारीचे सूर, अशी नादसरिता राग सिहेंद्र मध्यमाच्या रुपाने रसिकांना आनंद देणारी ठरली. ‘एकला चलो रे…’ ही धून एकत्रित सादर करत या रंगलेल्या सादरीकरणाची सांगता झाली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर रंगत वाढविणारी साथ केली.
सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाला. पं. कशाळकर यांनी राग हमीर पेश केला. ‘तेंडे रे कारन मेंडे रे यार…’ (झुमरा), ‘चमेली फुली चंपा…’ ही द्रुत बंदिश आणि त्याला जोडून त्यांनी तराणा सादर केला. त्यानंतर राग अडाणा मधील रचनांचे सादरीकरण केले. रसिकांच्या आग्रहाखातर नटबिहाग रागातील ‘झनझनझन…’ आणि ‘डमरू डम डम बाजे…’ या रचना सादर केल्या. ‘जमुना के तीर…’, या भैरवीने त्यांनी सांगता केली. तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला), सुधीर नायक (हार्मोनिअम) आणि निर्भय सक्सेना, अद्वैत केसकर, सई महाशब्दे (तानपुरा आणि स्वरसाथ) यांनी साथ केली.
याबरोबरच पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी निर्माण केलेल्या ‘ताल फरिश्ता’ या उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावरील कॅलेंडरचे लोकार्पण बुधवारी मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, सतीश पाकणीकर, पं. श्रीनिवास जोशी यावेळी उपस्थित होते. ‘ताल फरिश्ता’ या थीम कॅलेंडरच्या माध्यमातून झाकीरभाईंच्या स्मृती जपताना १९८५ ते २०१९ या कालावधीत टिपलेली त्यांची बारा कृष्ण-धवल प्रकाशचित्रे व सोबतच प्रत्येक पानावर भारतातील नामांकित कलावंतानी त्यांच्या जागवलेल्या आठवणी आहेत. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
