Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

छायाचित्रकारांनी नेहमी नावीन्याच्या शोधात राहिले पाहिजे- ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे

पुणे :  ‘‘तीस वर्षापूर्वी वृत्तपत्रांच्या छायाचित्रणामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून दररोज नवीन साधने येत आहेत. डिजिटल नंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला आहे. त्यामुळे लाइटरूमची जागा आता प्रॉम्टरूमने घेतली. या काळात छायाचित्रकारांनी नेहमी नावीन्याच्या शोधात राहिले पाहिजे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांनी गुरूवारी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालनात छायाचित्र आणि व्हिडिओ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.४) ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांच्या हस्ते प्रदर्शानाचे उद्‍घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले आदी उपस्थित होते. नागरिकांना हे प्रदर्शन शनिवार (ता.६) पर्यंत विनाशुल्क पाहता येणार आहे.

नाकवे म्हणाले, ‘‘एआय पूर्णपणे शिकून त्याचा वापर करणेही तेवढेच गरजेचे आहे. एआयचा वापर वाढल्याने सत्य पडताळणीची (फॅक्ट चेक) आवश्यकता वाढत आहे. छायाचित्र किंवा व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. एआय शिकणार नाही, असा एककल्ली पणा सोडला पाहिजे. एककल्ली राहिलात तर या काळात माणूस बाहेर होतो. त्यासाठी छायाचित्रकारांनी आयुष्यभर शिकत राहावे.’’

प्रास्ताविकामध्ये पत्रकार संघाची भूमिका मांडताना पाटील म्हणाले, ‘‘छायाचित्रकार हा नेहमी नेकक्या प्रश्नांवर बोट ठेवून समाजातील घडामोडी त्यांच्या छायाचित्रातून मांडत असतो. अनेकदा छायाचित्रच बोलत असते. त्यामुळे त्याबद्दल अधिक विस्तृतपणे मांडणी करण्याची गरज भासत नाही. समाजातील आरसा म्हणून छायाचित्रकार हे काम करतात.’’ तेजस टवलारकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading