श्री दत्त जयंती निमित्त पीएमपीएमएलची ३ ते ५ डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र नारायणपूर साठी यात्रा स्पेशल बसेसची सोय
– पीएमपीएमएल च्या स्वारगेट व सासवड मुख्य बस स्थानकांवरून सुटणार यात्रा स्पेशल बसेस
पुणे : पीएमपीएमएल कडून श्री दत्त जयंती निमित्ताने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल च्या स्वारगेट व हडपसर या मुख्य बस स्थानकांवरून दिनांक ३ ते ५ डिसेंबर असे तीन दिवसांकरिता यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
श्री दत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर यात्रेसाठी स्वारगेट बस स्थानकावरून ८ बसेस अर्धा तास वारंवारितेने तर सासवड बस स्थानकावरून ५ बसेस २० मिनिटे वारंवारितेने अशा एकूण १३ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट बस स्थानकाहून सुटणाऱ्या बसेसचा मार्ग स्वारगेट, मार्केटयार्ड, कोंढवा बु.।।, खडीमशीन चौक, बोपदेव घाट, चांबळी, सासवड मार्गे नारायणपूर असा राहील. तर सासवड बस स्थानकाहून सुटणाऱ्या बसेस सासवड बस स्थानक, जेजुरी नाका, सासवड कोर्ट, सुपे खुर्द फाटा, भिवडी, किल्ले पुरंदर फाटा, नारायणपूर या मार्गे जातील.
स्वारगेट ते नारायणपूर पहिली बस सकाळी ०६.०० वा. तर शेवटची बस सायंकाळी ०६.३० वा. मार्गस्थ होईल. तर नारायणपूर ते स्वारगेट पहिली बस सकाळी ०८.०० वा. तर शेवटची बस रात्रौ ०८.३० वा. मार्गस्थ होईल. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.
