पाक पुरस्कृत दहशतवादाचे समूळ उच्चाटन करा; शिवसेनेचे भांडुप मध्ये जोरदार आंदोलन
मुंबई – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत असून बंद, रास्ता रोको आंदोलन, मोर्चे, कॅन्डल मार्च काढून आपला संताप व्यक्त केला जात आहे. भांडुप रेल्वे स्थानकाजवळ शिवसेनेच्यावतिने आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या दुर्दैवी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी या घटनेचा निषेध करीत दहशतवादाचा कणा मोडून काढल्याशिवाय दहशतवाद संपणार नसल्याचे सांगितले.
पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ निष्पाप जीवांची हत्या केली. ह्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. देशाचे नंदनवन समजल्या जाणा-या काश्मिर मध्ये अशा प्रकारे हल्ला करुन दहशतवादी भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी कधी नव्हे असा भ्याड हल्ला करीत त्यांनी नि:शस्त्र असलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २५ पर्यटकांचा आणि एका स्थानिक घोडेस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मनाला सुन्न करणा-या या घटनेने देशात संतापाची लाट निर्माण झाली. ठिकठिकाणी बंद, मोर्चे, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवेसेनेच्यावतिने भांडुप रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी या घटनेचा निषेध केला. पाकिस्तानला योग्य धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ असून पाक पुरस्कृत दहशतवादाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत राजोल संजय पाटील यांनी व्यक्त केले.
