छत्रपतींसह एक संपूर्ण पिढी जिजाऊंनी घडवली – मृणाल कुलकर्णी
पुणे – राजा शिवछत्रपती या मालिकेच्या निमित्ताने मला प्रथम जिजाऊ मासाहेबांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्याचा, स्वतंत्र राज्याचा ध्यास घेतलेल्या या अत्यंत कणखर, खंबीर अशा स्त्री होत्या. जिजाऊ मासाहेबांनी इथल्या मावळ्यांना चाकरीऐवजी स्वतंत्र राज्याचा वसा दिला. विश्वास दिला. त्याला कृतीची जोड दिली. छत्रपतींसह एक संपूर्ण पिढीला जिजाऊंनी घडवले त्यामुळे अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी, हा आनंद आणि मोठी जबाबदारी दोन्ही होती. यामध्ये आजोबा गो. नी. दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या इतिहास प्रेमाची खूप मदत झाली असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभाचे कार्य करणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान फौंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांनी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाजन यांनी लेखक, अभिनेता व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्याशी देखील संवाद साधत त्यांच्यावरील संस्कार, शिक्षण, परिश्रम, संघर्ष यांची कथा उलगडली. सदर कार्यक्रम हा मोरेश्वर सभागृह कोथरूड येथे संपन्न झाला.
यावेळी आपले अनुभव कथन करताना वयाच्या २२ व्या वर्षी आयपीएस झालेले अधिकारी वैभव निंबाळकर यांनी आसाम येथील आपल्या कार्यकाळातील चित्तथरारक अनुभव कथन केले. छापा टाकून अमली पदार्थ पकडल्यानंतर शोधकार्य सुरु असतांना अचानक सुरु झालेल्या गोळीबारात आपले ६ जवान मृत्युमुखी पडतांना पहिले व आपल्या पायाला गोळी लागली त्यावेळी. वडिलांनी दिलेल्या सद्गुरू वामनराव पै याच्या विचारांच्या संस्कारांमुळे या कठीण परिस्थितीशी सामना करता आला. या एका प्रसंगाने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे नेमके काय हे समजले असे निंबाळकर यांनी सांगितले.
आयपीएस वैभव निंबाळकरांनी वर्णन केलेल्या थरारक प्रसंगाने हाऊसफुल सभागृहदेखिल थरारून गेले आणि पायात घुसलेली गोळी सहन करत आपल्या यूनिटमधील प्रत्येकाची सुटका झाल्यावरच स्वतः वैद्यकीय मदत स्वीकारण्याच्या वैभव यांच्या जिगरबाजीला उपस्थितांनी जागेवर उभे राहून मानवंदना दिली.
निपुण धर्माधिकारी म्हणाले, “मला पं. सत्यदेव दुबे यांचा सहवास ४० तास लाभला आणि आज २० वर्षे उलटूनही त्यांचे मार्गदर्शन अखंड आहे, ही माझी भावना आहे”.
याप्रसंगी दीपस्तंभतर्फे दीपक शहा, अजय साठे, सचिन खेर मंचावर उपस्थित होते. भाऊसाहेब जाधव, चंद्रशेखर सेठ, शैलेश शहा, भारत व्होरा, गंगाधर पाटील, शरद आठल्ये, सीमा दाबके, गायत्री, दिनेश महाजन, अमोल लंके, प्रथमेश सिन्हा आदींचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या दृकश्राव्य फितींचे सादरीकरण झाले. टेकचंद सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. ऋषीकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दीपस्तंभ तर्फे प्रशिक्षणासाठी मदतीचा हात मिळालेल्या ऋषीकेश पवार यांनी युपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलखात देवून आले आहेत व आता निकालाची वाट पाहत आहेत. पवार हे दिव्यागांच्या ऐका श्रेणीतील उमेदवार आहेत.
