Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

कसदार गायन, सुरेल संतूरवादनाने १९ व्या पं जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचा समारोप

पुणे : शैक्षणिक तज्ज्ञ, संगीतकार व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या प्रा समीर दुबळे यांचे कसदार गायन, पं अभय रुस्तुम सोपोरी यांचे घराणेदार संतूरवादन आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांची भावपूर्ण भजने अशा एकाहून एक सरस सादरीकरणाने आज १९ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचा समारोप झाला.

आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात हा तीन दिवसीय महोत्सव संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पं. शौनक अभिषेकी, पं. सत्यशील देशपांडे, उज्ज्वल केसकर, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिला विद्याताई अभिषेकी स्मृती पुरस्कार लेखिका शैला मुकुंद यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मागील १९ वर्ष आयोजित होत असलेल्या पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे कौतुक केले. या महोत्सवात दिग्गज कलाकारांसोबत युवा आश्वासक गायकांसाठी होत असलेल्या ‘युवोन्मेष’ या उपक्रमाचे कौतुकही पाटील यांनी केले. सांस्कृतिक क्षेत्रात नवी पिढी तर होणे आवश्यक असून अशा महोत्सवाद्वारे त्याला वाव दिला जात असल्याचे समाधान पाटील यांनी व्यक्त केले.

वयाच्या १० व्या वर्षापासून मी पं अनुप जलोटा यांची भजने ऐकत आलो आहे. एखाद्या भजनाने आपली इष्ट देवता आपल्या समोर साकारणे म्हणजे काय हे त्यांच्या भजनातून आपण अनुभवतो असे सांगत पाटील यांनी जलोटा यांचे कौतुक केले.

यावेळी पुण्यातील त्यातही कोथरूडमधील बागांमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम महानगरपालिकेने बंद केले होते ते सुरू करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या त्याबद्दल उज्ज्वल केसकर यांनी पाटील यांचे आभार मानले. यानंतर ताथवडे उद्यानात दर महिन्याला दोन सांस्कृतिक कार्यक्रम होतील असेही केसकर यांनी जाहीर केले.

पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना शैला मुकुंद म्हणाल्या की “अभिषेकी बुवांवर पुस्तक लिहित असताना विद्याताई यांचा सहवास लाभला आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा आहे.”

प्रा. समीर दुबळे यांनी राग श्याम कल्याणने महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या सत्राला आपल्या सादरीकरणाने सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘आओ ना मोरे पिया…’, ‘पायल मोरी पायल, रे सजना…’, ‘ बेला सांझ की…’ या रचना पेश केल्या. ‘ आधी रचिली पंढरी…’ या संत नामदेवांच्या अभंगाने त्यांनी समारोप केला. प्रा दुबळे यांना उदय कुलकर्णी (संवादिनी), चारुदत्त फडके (तबला), ज्ञानेश्वर दुधाने (पखवाज), निलेश धाक्रस (गायन) तर रविराज काळे व पल्लवी पिळणकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर प्रसिद्ध संतूर वादक, संगीतकार पं अभय रुस्तुम सोपोरी यांचे संतूर वादन रंगले. यावेळी त्यांनी राग जोग ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीला आलाप जोड सादर केले. यानंतर त्यांनी काही गत, बंदिशी, झपताल, छंद, तराणा यांची प्रस्तुती केली. आपले वडील पं भजन सोपोरी यांचे तीन तालातील गतही त्यांनी वाजविली.

आपल्या वडिलांची आणि घराण्याची शैली म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सोपोरी बाज’ चे बहारदार सादरीकरण त्यांनी केले. गायकी अंगाने त्यांनी केलेले संतूरवादन सुरांच्या अनेक छटा रसिकांसमोर अलगदपणे उलगडणारे ठरले. गायकी आणि तांत्रिक अंगाने त्यांनी केलेले संतूर वादन सोपोरी घराण्याचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे ठरले. पं. अभय सोपोरी यांना पं दुर्जय भौमिक (तबला) आणि अंकित पारिख (पखवाज) यांनी साथ संगत केली.

पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या सादरीकरणाने झाला. ‘काशी बदली अयोध्या बदली अब मथुरा की बारी है… ‘, ‘ अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम…’, राम आएंगे…’, ‘ऐसी लागी लगन…’ ही भजने जलोटा यांनी गायली. त्यांना देवेंद्र कुमार भारती (तबला), हिमांशु तिवारी (गिटार), मनीष सोळंकी (की बोर्ड), करिष्मा (गायन) यांनी साथ संगत केली. भरत ओझा यांनी त्यांचे टीम मॅनेजर म्हणून काम पाहिले. रवींद्र खरे यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading