Saturday, May 16, 2026
BusinessLatest NewsPUNE

मध्यम आकाराच्या उद्योजकांनी आपल्या कंपन्यांची  स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करावी

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांचा उदयॊजकांना सल्ला

पुणे  : मध्यम आकाराच्या उद्योजकांना  आपल्या व्यवसाय वाढवताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यामध्ये आर्थिक बाजूचा समतोल साधण्यासाठी त्यांना विविध पातळ्यांवर अनेक कसरती कराव्या लागत असतात, यावर मार्ग काढायचा असेल तर त्यांनी स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करण्याचा सल्ला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी उदयॊजकांना दिला. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अँड ऍग्रीकल्चर (डीसीसीआयए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा चौहान यांच्या उपस्थितीत हॉटेल शेरटन ग्रँड येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, सचिव वासुदेव मालू, खजिनदार प्रकाश ढोका, व्यवस्थापकीय समिती सदस्य योगेश वाघानी व बिभू प्रसाद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डीसीसीआयएच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. यामध्ये एमसीसीआयचे माजी अध्यक्ष व पिनॅकल इंडस्ट्रीजचे डॉ. सुधीर मेहता यांना उत्कृष्ट उदयॊजक या पुरस्काराने गौरवण्यात आले तर ओरिएंट रबरचे विशाल मकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर उदयॊग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. चौहान यांचाही यावेळी पुणेरी पगडी, गणपतीची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

व्यावसायिकांना व्यवसाय करताना मुख्य अडचण येते ती वित्त पुरवठ्याची, माझी देखील स्वतःची कंपनी होती, तेव्हा आर्थिक बाजू सांभाळताना अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागल्याचे उदाहरण देताना, चौहान म्हणाले,  “उद्योग करत असताना अपयश आले तर त्यामधून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. व्यवसाय करणारी व्यक्ती हे एक अजब रसायन असते. ज्या प्रमाणे एखादा सिनेमा तयार करताना दिग्दर्शक, निर्माते, लेखक, कलाकार हे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असतात, तशाच प्रकारे ही व्यक्ती एकटीच व्यवसाय पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असते. उत्पादन बाजारात पोहचवणे, आपल्याकडील कामगार मंडळींचे पगार, व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असणारा निधी अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश असतो.”
विशेष म्हणजे मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करताना चांगल्या प्रकारचा आर्थिक समतोल साधायचा असेल तर त्यांनी स्टॉक एक्स्चेंजवर येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुण्याजवळील रांजणगाव उद्योग क्षेत्रात कचऱ्याचा प्रश्न जटील झाला होता, त्यामध्ये लक्ष घालून तो मार्गी लावण्याचे काम करण्यात आले आहे. याखेरीज पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे, त्यावर मार्ग काढण्यासाठी या भागाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भविष्यात उत्तम प्रकारची गुंतवणूक इथे येणे अपेक्षित असेल, तर त्यासाठी मुबलक प्रमाणात जागा आणि विजेची उपलब्धता असणे आवश्यक असल्याचे रथिन सिन्हा यांनी नमूद केले.

गेल्या ३० वर्षापासून डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अँड ऍग्रीकल्चर ही संस्था कार्यरत असून त्यांचे २०० सभासद असल्याचे उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, डीसीसीआयच्या पुढाकाराने राज्यातील इंडस्ट्रीयल बेल्ट हा नजीकच्या काळात इन्व्हेस्टमेंट बेल्ट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. भारताची अर्थव्यवस्था जर ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची असेल तर महाराष्ट्राचे त्यामधील योगदान हे १ ट्रिलियन डॉलर असले पाहिजे. हे करण्यासाठी आपल्याला राज्याची अर्थव्यवस्था आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी लागेल. सरकार उद्योगांच्या वाढीसाठी आणि इझ ऑफ बिझिनेस अर्थात व्यवसाय सुलभता यावी या करीत असलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे. शिवाय ‘मैत्री’ पोर्टलद्वारे महाराष्ट्र व्यापार आणि गुंतवणूक कायदा २०२३ कार्यान्वित झाल्यामुळे अनेक सकारात्मक बदल होतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्य सरकार काम करीत असलेल्या नव्या औद्योगिक धोरणामध्ये डीसीसीआयच्या वतीने आम्ही अनेक सूचना दिल्या असून त्यांचाही अंतर्भाव या धोरणात होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading