Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

खाजगी सोसायटीमधील एसटीपी सल्लागार एजन्सीची नेमणुकीचे कोटेशन रद्द करा – विजय कुंभार

 

पुणे :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी सोसायट्यांमधील STP ( सांडपाणी प्रक्रिया संयंत्र) कायमस्वरुपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागार एजन्सीची नेमणुक करण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आणि शहरातील नागरिकांवर अन्याय करणारा आहे.या विषयाचे कोटेशन ( पर्यावरण/पर्या/२१/२०२३-२४) नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून त्यातील अटी पाहता काही ठराविक व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून ते तयार करण्यात आले असावे अशी शंका घ्यायला जागा आहे. त्याहीपेक्षा जास्त गंभीर बाब म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेऊन ते एका खाजगी संस्थेला देण्याचा हा प्रयत्न आहे. असे करणे बेकायदा तर आहेच परंतु ते पिंपरी चिंचवड मधील नागरिकांवर अन्याय करणारेही आहे.
या कोटेशनमधील अटी शर्ती आणि सल्लागारांनी करावयाची कामे यांची यादी पाहता सोसायटयांचा छळ होण्याची अधिक शक्यता वाटते. शिवाय भीती घालून नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दराने एसटीपीच्या अटींची पूर्तता करायलाही सांगितले जाऊ शकते. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सल्लागार संस्थेने “खाजगी सोसायट्यांना भेट देऊन मैलाशुद्धीकरण केंद्रास भेट देणे, सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव अथवा सभासद यांना मैलाशुद्धीकरण केंद्राबाबत पुरेशी माहिती देऊन मैलाशुद्धीकरणाचे महत्व समजविणे, तांत्रिक सहाय्य करणे, सर्व STP मध्ये Online Monitoring System बसविणेस मदत करणे, वार्षिक देखभाल दुरुस्ती साठी (AMC) योग्य एजन्सी देणे व त्यांचे कामावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे”. म्हणजेच संस्थेने सल्ला देताना सोसायट्यांना योग्य तो STP प्लांट सुचवायचा आहे, वार्षिक देखभाल दुरुस्ती साठी (AMC) योग्य एजन्सीसुचवून त्यांच्या कामावर नियंत्रणही ठेवायचे आहे. थोडक्यात म्हणजे सर्व सोसायट्यांमधील STP संदर्भातील सर्व निर्णय या एजन्सीकडे सोपवून तोंड दाबून बुक्यांचा मार्ग सहन करणे एवढच सोसायट्यांच्या हातात उरणार आहे.
पुढे जाण्याआधी या कामासाठी जो सल्लागार नेमला जाणार आहे त्याच्या पात्रतेच्या अटी काय ठेवल्या आहेत ते पाहू.

  1. अर्ज करणा-या इच्छुक सल्लागार एजन्सी यांनी किमान ५०० KLD पेक्षा जास्त क्षमतंचं मैलाशुद्धाकरण केंद्र बांधणे किंवा अशा केंद्राची किमान ३ वर्ष चालन देखभाल दुरुस्ती केल्याचा अनुभव असावा. तसेच किमान ५०० MLD पेक्षा जास्त क्षमतेचे STP / ETP प्रत्यक्ष Design करुन सद्यस्थितित गेल्या २ वर्षांपासुन कार्यान्वित असल्याचा अनुभव असावा.
  2. सल्लागार एजन्सींना सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित किमान ५०० KLD पेक्षा जास्त क्षमतेच्या STP चे Design, Operation and maintenance चा अनुभव असणे आवश्यक आहे. याकरीता एजन्सीकडे अनुभवी तसेच शैक्षणिक अर्हता असेलेले मनुष्यबळ असणे बंधनकारक राहील.
  3. इच्छुक एजन्सींकडे किमान BE/ME Environmental Engineering, MSc Environmental अथवा BE/ME Chemical Engineering शैक्षणिक अर्हता असलेले कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच मदतीसाठी BE Civil Engineering अथवा Diploma in Civil Engineering कर्मचारी ठेवणे आवश्यक असल्यास त्यांना किमान १५ दिवसांचे COEP अथवा तत्सम संस्थेमार्फत STP Operation बाबत प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र निविदा मिळाल्यापासुन ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक राहील.
    कोणत्याही सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया संयंत्र केवळ कायमस्वरुपी कार्यान्वित आहे की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतक्या गंभीर अटी कशासाठी?.सल्लागाराला किमान ५०० KLD पेक्षा जास्त ( म्हणजे १७५ टन प्रतीदिन) क्षमतेच्या STP चे चालन देखभाल दुरुस्ती, Design, Operation and maintenance चा अनुभव असणे, किमान BE/ME Environmental Engineering, MSc Environmental अथवा BE/ME Chemical Engineering शैक्षणिक अर्हता असलेले कर्मचारी असणे आवश्यक आहे. यामुळेच कुणातरी विशिष्ट एजन्सीला डोळ्यासमोर ठेऊन ही प्रक्रिया राबवली जात असल्याची शंका घ्यायला जागा उरतेकशासाठी हे सगळं? पालिकेचे अधिकारी STP ( सांडपाणी प्रक्रिया संयंत्र) कायमस्वरुपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेउ शकत नाहीत का ? नसतील तर त्यांना पगार कशाचा मिळतो?

आता या सल्लागार संस्थेने काय कामे करायची आहेत ते पाहू .

  1. सल्लागार एजन्सीने मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी STP ची प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करुन साप्ताहिक अहवाल पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कनिष्ठ अभियंता / उप अभियंता यांचेमार्फत पर्यावरण विभागाकडे सादर करायचा आहे.
  2. सोसायटीचे खाजगी STP कार्यान्वित असल्याबाबतची Online Monitoring System सोसायटीने कार्यान्वित केल्यानंतर याबाबतची माहिती मनपा संकेतस्थळावर अथवा मनपामार्फत सुचित केलेल्या संकेतस्थळावर Upload करणे बंधनकारक राहील.
  3. प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तपासणी सूचीनुसार तपासणी करणेत यावी.
  4. प्रत्येक सोसायटीला भेट दिल्यानंतर खालील बाबींची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.
  5. सोसायटीमध्ये योग्य क्षमतेचा STP आहे काय?
  6. STP कोणत्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे त्यानुसार क्षमता योग्य आहे का?
  7. सोसायटीचे ड्रेनेज कनेक्शन मनपा ड्रेनेज लाईनला आहे काय? यासाठी परवानगी आहे काय ? अधिकृत / अनधिकृत ड्रेनेज कनेक्शन आहे काय?
  8. Inlet व outlet ला Flow meter बसविणेत आले आहेत का?
  9. STP मध्ये सांडपाण्यावर MPCB च्या नॉर्म्सनुसार प्रक्रिया करणेत येत आहे का?
  10. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणेत येतो का? जास्तीच्या पाण्याचा निचरा कोठे केला जातो.
    वरील सर्व बाबी पहाता खाजगी सोसायट्यांमधील STP ( सांडपाणी प्रक्रिया संयंत्र) कायमस्वरुपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागार एजन्सीची नेमणुक करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय चुकीचा,बेकायदा आणि शहरातील नागरिकांवर अन्याय करणारा तर आहेच परंतु यातून प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत असल्याचेही सिद्ध होते. वरील बाबींचा विचार करून आपण सदर कोटेशन प्रक्रिया तातडीने रद्द करावी अशी मागणी आम आदमी पार्टी आणि सुराज्य संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading