Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

गायन आणि वादनाने रंगली ‘संगीत संध्या’

पुणे  : पुण्यातील स्वराधार फाउंडेशनच्या वतीने नुकताच ‘संगीत संध्या’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुणेकर रसिकांनी गायन आणि वादनाची सुरेल अनुभूती अनुभविली.

एरंडवणे, गणेश नगर येथील कर्नाटक हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. एयर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से.), स्वराधार फाउंडेशनचे संचालक नील दीक्षित व हेरंब चक्रदेव आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य असलेल्या अतुल खांडेकर यांच्या गायनप्रस्तुतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी राग श्याम कल्याण आणि राग हेमंतचे बहारदार सादरीकरण केले. संत मीरा बाई यांच्या ‘बरसे बदरिया सावन की..’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर प्रणव गुरव आणि संवादिनीवर अभिषेक शिनकर यांनी समर्पक साथ केली.

यानंतर पंडित रामदास पळसुले यांच्या एकाल तबलावादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ताल झपताल सादर करून कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला. त्यांना प्रथमेश अमरुळे यांनी तबलासाथ केली तर अभिषेक शिनकर यांनी नगमा साथ केली.

एयर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते तबलावादन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पं. रामदास पळसुले यांचे शिष्य प्रथमेश अमरूळे यांना स्व. पंडित सामता प्रसाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलुरकर यांना स्व. उस्ताद अल्लारखा खाँसाहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व तालयोगी पं सुरेश तळवलकर यांचे शिष्य वेदांग जोशी यांना स्व. पं. किशन महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुण्यातील ज्येष्ठ आयोजक गोविंदराव बेडेकर यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांचा विशेष सत्कार देखील कार्यक्रमात करण्यात आला.

मंगेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर नील दीक्षित यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading