नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज काटोल रोड व कामठी रोडवरील शासकीय मुलींचे बालगृह, सरस्वती मतिमंद महिलांचे वसतीगृह, सखी वन स्टॉप सेंटर तसेच करूणा महिला बालगृह येथे भेट दिली.
श्रीमती तटकरे यांनी वसतीगृहातील महिला व मुलींच्या आरोग्याची देखभाल, सकस आहार, शाळा-कॉलेज मधील उपस्थिती, अनाथ मुलींना पालक मिळवून देण्यासाठी होत असलेले प्रयत्न याबाबत माहिती जाणून घेतली. शासकीय व विविध सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमात मुलींना सहभागी करून घेत त्यांना मानसिक, शारिरिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय आयुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर, वसतीगृहाच्या अधीक्षीका मनिषा आंबेडारे व एस.एस.मांडवेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आदि उपस्थित होते.
