Tuesday, July 7, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्रीय मंडळाने देशी क्रीडाप्रकार जतन-संवर्धनाचे कार्य केले – रितेश कुमार यांचे गौरवोद्गार

पुणे : महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था तब्बल शंभर वर्षांपासून किशोर आणि युवा पिढीवर शारीरिक, मानसिक आरोग्याचे, तंदुरुस्तीचे संस्कार करत आहे. अनेक देशी क्रीडाप्रकारांचे जतन आणि संवर्धन संस्थेत होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आधुनिकीकरणाच्या रेट्यातही संस्थेने आपली परंपरा जपली आहे, असे गौरवोद्गार पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी रविवारी येथे काढले. महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस कै रमेश शिवरामपंत दामले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ वैजयंती खानविलकर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका वैद्य यांना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी विशेष समारंभात रितेश कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रितेशकुमार बोलत होते.
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीकांत बापट, डॉ. खानविलकर, देविका वैद्य यांचे वडील पूर्णेंदु वैद्य, संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्काराचे हे ११ वे वर्ष असून रविवारी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्रीय मंडळ गुलटेकडी येथील सकल ललित कलाघर येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
देविका वैद्य यांचा पुरस्कार त्यांचे वडील पूर्णेंदु वैद्य यांनी स्वीकारला. याबरोबरच कै हरिभाऊ चितळे स्मरणार्थ व अनुराधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे महाराष्ट्रीय मंडळाच्या सर्व शाळांमधून इयत्ता १० वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक देण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रीय मंडळ इंग्रजी मिडीयम हायस्कूल, टिळक रस्ता येथील विद्यार्थिनी सई प्रसाद साने हिला पारितोषिक देण्यात आले. तसेच ऋषिकेश अरणकल्ले यांना मल्लखांब या खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव मंडळाच्या वतीने करण्यात आला.
मनोगत मांडताना डॉ. खानविलकर यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘किशोरवयातले कित्येक दिवस मी येथे सराव केला, शारीरिक श्रम आणि मानसिक संतुलनाचे धडे मी येथे शिकले. पुढील आयुष्यात जे केले, त्याचे संस्कार इथून मिळाले, असेही त्या म्हणाल्या.
भूषण गोखले यांनी अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्रीय मंडळाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांची माहिती दिली. सर्व क्रीडाप्रकारांसोबत पारंपरिक भारतीय क्रीडाप्रकारांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश असून, आंतरराष्ट्रीय योग परिषद, दिव्यांगांसाठी क्रीडा तसेच अंध क्रीडापटूंसाठी उपक्रम करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. श्रीकांत बापट यांनी परिचय करून दिला. संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब आणि योगासनांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading