Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

कलेच्या माध्यमातून शिक्षणात येईल अधिक रंजकता : श्रीरंग गोडबोले


पुणे : बोलक्या बाहुल्यांच्या खेळात मुले रमतात, त्यातून त्यांचे मनोरंजनही होते; परंतु ही मनोरंजनाची रेघ ओलांडून शैक्षणिक क्षेत्रात या कलेचा अंतर्भाव झाला तर या कला प्रकाराला एक वेगळी मिती मिळेल आणि शिक्षण अधिक रंजक होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी केले.
अभिनेत्री-कलावंत चैताली माजगांवकर-भंडारी यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या एक हजाराव्या प्रयोगानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. 26) त्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात माजगांवकर-भंडारी यांचा सत्कार गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांची विशेष उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कवयित्री प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते.
गोडबोले म्हणाले, पुरातन असलेली बोलक्या बाहुल्यांची ही कला भारतासह परदेशातही अस्तित्वात आहे. आजच्या काळात शालेय विद्यार्थ्यांचा अटेंशन स्पॅन कमी होत चालला आहे. एका ठराविक कालावधीनंतर मेंदू समोर घडणाऱ्या गोष्टी स्वीकारत नाही, अशा परिस्थितीत न कळत्या वयापासूनच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मुलांचा अटेंशन स्पॅन वाढविणे शक्य होऊ शकेल. हा संस्कारक्षम कलाप्रकार शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल; कारण हा कलाप्रकार व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्टचा संगम आहे. शालेय शिक्षणात या कलांचा समावेश व्हावा, अशा प्रकारच्या कला शिकविणाऱ्या संस्था निर्माण व्हाव्यात यातून कला आणि शिक्षणाची सांगड घातली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जयमाला इनामदार म्हणाल्या, प्रेक्षकांना जास्त काळ खिळवून ठेवून आपल्या कलेच्या माध्यमातून हसविणे सोपे नाही. हे अवघड कार्य चैताली तिच्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमातून करीत आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माजगांवकर-भंडारी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याशी ॲड. प्रमोद आडकर व ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी संवाद साधला. प्रेक्षकांनी कलाकाराचे कौतुक करणे, त्याच्या कार्याची दखल घेणे हे हवेहवेसे असते. या सत्काराने प्रोत्साहन मिळून मी या कलेचा जास्तीतजास्त प्रमाणात प्रसार करेन असे सांगून माजगांवकर-भंडारी म्हणाल्या, मला घरातच या कलेचे बाळकडू मिळाले. शिक्षिका असलेलया माझ्या आईने पुस्तकी शिक्षणाचा आग्रह न धरता माझ्यातील कलागुण ओळखून तिने व वडिलांनी मला कलेच्या प्रांतात शिक्षण घेण्यास नेहमीच प्रोत्साहित केले. अभ्यासाचे नाटक करता करता मी नाटकाचा अभ्यास ललित कला केंद्रातून पूर्ण केला. आजच्या ॲनिमेशनच्या युगात बोलक्या बाहुल्यांचा कलाप्रकार टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे, कारण हा कलाप्रकार नुसता खर्चिकच नसून यात संवादफेक, संहिता लेखन यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलाकार कधी समाधानी नसावा. कलाकाराने एकाच कला प्रकारात अडकून राहणे योग्य नाही तर आपल्याला आवडतील अशा विविध कलाप्रकारांना आत्मसाद करणे आवश्यक आहे. घरातील सदस्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी या क्षेत्रात ठामपणे उभी राहू शकले, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी आडकर फौंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading