Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

व्यवसायिक रंगभूमीची दारं माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली – पुरूषोत्तम बेर्डे

पुणे – पुण्याशी माझे खूपच जिव्हाळ्याचं नातं आहे. मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक टुरटूर १९८३ साली रंगभूमीवर आणलं. मुंबईत त्याच ७ – ८ प्रयोग केले. पण तेथे तिकीट विक्रीचा आकडे कधीही ३०० – ४०० रूपयांच्यावर गेला नाही. अशा परिस्थितीत मी हेच नाटक पुण्यात भरत नाट्यमंदिरयेथे प्रयोग लावला. तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. त्यानंतर याच नाटकाचे प्रयोग नाशिकला व त्यानंतर उर्वरीत महाराष्ट्रात हाऊसफुल्ल झाले. त्यानंतर मुंबईत त्याचे प्रयोग असेच झाले. व्यवसायिक रंगभूमीचे दरवाजे पुणेकरांनी माझ्यासाठी उघडले अशा भावना निर्माता, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी आज यशवंत – वेणू पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केल्या. दरम्यान, दिग्दर्शनाचेही सुरूवातीचे धडे आपण पुण्यातच माझे गुरू राजदत्तजी यांच्या हाताखाली गिरवले अशी कबुलीही त्यांनी दिली.
देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन, यशवंराव चव्हाण नाट्यगृहाचा वर्धापन दिन, प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृती दिन आणि रंगकमी दिनाचे औचित्यसाधून अखिल भारतील मराठी नाट्य परिषदेच्या कोथऱूड शाखेच्यावतीने यंदाचा यशवंत-वेणू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे आणि अनिता बेर्डे यांना जेष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनिता बेर्डे यांना स्वन्पाली गोखले यांनी साडीचोळी देऊन त्यांचाही सन्मान केला. त्यावेळी बेर्डे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमीत गोखले, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजीत धांडेकर, समीर हंपी आणि खजिनदार प्रदीप गुप्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. . मानपत्र, स्मृतीचिन्हं, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बेर्डे म्हणाले, पहिला चित्रपट हमाल दे धमाल करण्यापूर्वी दिग्दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी आपण राजदत्तजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या चिमणराव गुंड्याभाऊ या हिंदी मालिकेचे सर्व चित्रिकरण पुण्यातचे झाले. या मालिकेत सहाय्यक म्हणून आपण त्यांच्याकडे दिग्दर्शनाचे धडे गिरवले. तसेच कॉलेजमध्ये असतान दांडी मारून चित्रपट नाटकं न बघता किंवा टाइमपास न करता आपण रेकॉर्डिंग स्टुडिओत लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांचे रेकॉर्डिंग बघून बघून संगीत दिर्ग्दशनाचे धडे गिरवले.
यावेळी बोलताना राजदत्तजी म्हणाले, संत एकनाथांनी दिवसभर कष्ट करणा-यांना विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा आणि त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी भारूडे लिहिली. त्याच धर्तीवर पुरुषोत्तम बर्डे यांनी नाटक, चित्रपट, जाहिरात, महितीपट अशा क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी निख्खळ आनंद रसिकांना मिळवून दिला. पृथ्वीराज सुतार म्हणाले, बेर्डे यांचे नाव चित्रपट, नाटकांच्या संदर्भात अनेकदा ऐकले व त्याच्या कलाकृतीतून अनुभवलेले आहे. त्यांच्या सर्वच कलाकृतीतून ते सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या चित्रपट, नाटकांइतकेच चांगले, दमदार लेखन आहेत हे त्यांचे पुस्तक वाचल्यावरच लक्षात आले. त्यांच्या पुढच्या पुस्तकाची मला प्रतिक्षा आहे.
कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना समीर हंपी म्हणाले, रंगकर्मी घराबाहेर राहून लोकांचे मनोरंजन करत असतात. त्यावेळी घराची जबाबदारी त्यांच्या पत्नी स्वीकारतात आणि कलेच्या या अस्थिर क्षेत्रात काम करणा-या पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या रहातात. त्यामुळे आम्ही जो यशवंत वेणू पुरस्कार देतो तो त्या स्त्रीचा खरा गौरव असतो. त्याच या पुरस्कार सोहळ्याच्या उत्सवमूर्ती असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रत्ना दहिवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजीत धांडेकर यांनी केले.
या पुरस्कार वितरण समारंभाबरोबरच दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी शिरीष कुलकर्ण यांनी संवाद साधला. त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम “या सुखांनो या” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती मनिषा निश्चल (महक) यांनी केली आहे. या कार्यक्रमात राजदत्त यांच्याशी संवाद साधतानाच चित्रपटातील गाणी गायक गफार मोमीन आणि मनिषा निश्चल यांनी सादर केली. त्यांना विवेक परांजपे, मंदार देव, अजय अत्रे, मंगेश जोशी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन निलेश – प्रीतम यांनी केले होते. कार्यक्रमाचे आयोजन गेट सेट गो हॉलिडेज प्रा. लि. यांनी तर प्रस्तुरी पूना गेस्ट हाऊसने केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading