राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘फ्युजन २०२३’ ने ११ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप
पुणे : अभिजात भारतीय संगीतासोबतच सादर झालेले फ्युजन संगीत … सरोद, तबला आणि संवादिनी सोबतच जेंबे, ड्रम्स आणि की बोर्ड यांनी धरलेला ताल याने आज पुणेकर रसिकांच्या हृदयाचा ठेका चुकवला…
निमित्त होते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी संपन्न होत असलेल्या ११ व्या तालचक्र महोत्सवाचे. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून व पुनीत बालन समूह यांच्या सहकार्याने या वर्षीचा तालचक्र महोत्सव संपन्न होत आहे.
आज महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे, लोकमान्य मल्टीपर्पजचे पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव, बँक ऑफ इंडियाचे सह महाव्यवस्थापक अभिनव काळे, चंदुकाका सराफचे जाहिरात व विपणन प्रमुख अमोल पात्रे, यांबरोबरच ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे व चंदुकाका सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे आदींची उपस्थिती महोत्सवाला लाभली.
आजच्या महोत्सवाच्या समारोप सत्रात पं वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी आपले गायन सादर केले. राहुल देशपांडे यांनी यावेळी फ्युजन २०२३ हा खास कार्यक्रम प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी अभिजात शास्त्रीय संगीत आणि फ्युजन यांचा सुरेख संगम साधला.
राग रागेश्री ने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘जिया मोरा लागे ना…’ ही मिश्र पिलू मधील ठुमरी प्रस्तुत केली. रुसी ना मानी राधा… या त्यांनी सादर केलेल्या रचनेने उपस्थितांची वाह वाह मिळविली. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘लागी कलेजवा कटार…’ या ठूमरीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंडित राम मराठे हे माझ्या प्रकृतीला मानवणारे कलाकार आहेत. ते उत्तम गायक होते, नट होते, तबलावादक होते आणि रागदारी संगीत उत्तम गायचे. ते माझे आजोबा पंडित वसंतराव यांची प्रकृती असलेले कलाकार होते असे सांगत राहुल देशपांडे यांनी संगीत मंदारमाला या नाटकातील पंडित राम मराठे यांनी गायलेले ‘ जय शंकरा गंगाधरा…’हे पद सादर केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधत राहुल देशपांडे म्हणाले, “या सर्व जुन्या कलाकारांमध्ये कलेची देवाणघेवाण होती, ऐकी होती, प्रेम होते आणि ते अगदी दिलखुलास होते. जे होतं ते काही हातचं राखून असं नव्हतं. आता ही भावना, हे प्रेम कमी झाले आहे. आता सगळे कलाकार एकमेकांपासून सांभाळून असतात. खुली दाददी देत नाहीत. मी या प्रकृतीचा नाही. मीआजोबांसारखा खुली दाद देणारा आहे. रसिक म्हणून समोर बसलो की जे समोर घडणार आहे त्याचा आनंद मी घेतो.” कोण कसा गायला, कुठे चुकला हे मी शोधत बसलो तर त्या संगीताचा आनंद मी घेऊ शकणार नाही असेही ते म्हणाले.
सुरुवातीला शास्त्रीय नसलेले मी डिस्कार्ड करून टाकायचो आता मात्र मी ते आवडणाऱ्या अनेकांना भेटतो. ते त्यांना का आवडतय हे समजून घेतो. एकच रचना प्रत्येक घराण्यात वेगवेगळ्या पद्धतीने सादर होते याचा अर्थ ती याच घराण्यातील परंपरेने गायली तर चांगली आणि दुसऱ्या पद्धतीने गायली तर चुकीची असे होत नाही. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असूच शकतो. संगीताची उपज यायची असेल तर लताबाई, आशाताई, बेगम अख्तर ऐक असे मला मुकुल शिवपुत्र काका म्हणाले होते असेही राहुल यांनी नमूद केले.
आपल्या ‘फ्युजन २०२३’ या विशेष कार्यक्रमाबद्दल बोलताना राहुल देशपांडे पुढे म्हणाले, समतोल राखला जाईल याचा विचार करूनच मी हा कार्यक्रम बनविला आहे. संगीताचा संवादात्मक आविष्कार म्हणूनच मी याकडे पाहतो. जुगलबंदीमध्ये चढाओढ असते या कार्यक्रमात मला सांगीतिक संवाद साधायचा आहे. हे होणे आज मला गरजेचे वाटते म्हणून मी हा कार्यक्रम करीत आहे. या सर्व रचना मी पूर्ण विचार करून निवडल्या आहेत असेही देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘ दिल की तपीशा आज है आफताब…’ या गीताने त्यांनी कार्यक्रमाचा आणि महोत्सवाचा समारोप केला.
राहुल यांना ईशान घोष (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), सारंग कुलकर्णी (सरोद), शिखरनाद कुरेशी (जेंबे) आणि अनय गाडगीळ (की बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
