सुमधुर सरोद वादनाने तालचक्रच्या तिसऱ्या दिवसाला प्रारंभ
पुणे : सेनिया बंगश घराण्याच्या ७ व्या पिढीचे कलाकार असलेले अमान अली बंगश यांच्या सुमधुर सरोदवादनसोबतच बनारस घराण्याचे पारंपरिक तबलावादन ऐकण्याची संधी आज पुणेकर रसिकांना मिळाली… निमित्त होते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी संपन्न होत असलेल्या ११ व्या तालचक्र महोत्सवाचे. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून व पुनीत बालन समूह यांच्या सहकार्याने या वर्षीचा तालचक्र महोत्सव संपन्न होत आहे.

आज महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे, लोकमान्य मल्टीपर्पजचे पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव, बँक ऑफ इंडियाचे सह महाव्यवस्थापक अभिनव काळे, चंदुकाका सराफचे जाहिरात व विपणन प्रमुख अमोल पात्रे, यांबरोबरच ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे व चंदुकाका सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे आदींची उपस्थिती महोत्सवाला लाभली.
महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात सेनिया बंगश घराण्याच्या ७ व्या पिढीचे कलाकार आणि सुप्रसिध्द सरोदवादक अमजद ली खान यांचे सुपुत्र व शिष्य अमान अली बंगश यांच्या बहारदार सरोद वादनाने झाली. त्यांनी यावेळी राग श्री सादर केला. यामध्ये त्यांनी मध्यलय झपताल आणि द्रुतलय तीनताल मध्ये दोन गत सादर केल्या. पंडित कुमार बोस यांनीही यावेळी बनारस घराण्याचे तबलावादन प्रस्तुत करीत पूरक तबलासाथ केली. यावेळी सागर पटोकार यांनी तानपुरासाथ केली.
