महाराष्ट्रीय मंडळ संस्थेचे येत्या विजयादशमीला १०० व्या वर्षांत पदार्पण
पुणे : मराठी तरुणांना व्यायामाची गोडी लागावी, भारतीय सैन्य दलात त्यांना स्थान मिळून त्यांच्या हातून देशसेवा घडावी या उद्देशाने १९२४ साली कै कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था येत्या विजयादशमीला शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने पुढील वर्षभरात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम व संस्थेच्या भविष्यातील योजनांविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कार्याध्यक्ष अविनाश घाटपांडे, सरचिटणीस रोहन दामले व संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.
मागील १०० वर्षांत शारीरिक शिक्षणासोबतच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणावर देखील संस्थेने भर दिला असून नजीकच्या भविष्यात संस्थेच्या अनेक योजना असल्याचे सांगत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, “मल्लखांब, कबड्डी, खोखो, योगासने यांसारख्या भारतीय क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लवकरच त्यासंबंधीच्या एका सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी महाराष्ट्रीय मंडळातर्फे करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये भारतीय खेळांवर संशोधन व्हावे, तसेच या खेळांचे योग्य प्रशिक्षण विद्यार्थी व खेळाडूंना घेता यावे, यावर आमचा भर असेल. सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा या ‘इनडोअर’ पद्धतीने विकसित केल्या जातील.”
महाराष्ट्रीय मंडळाला क्रीडा विद्यापिठाचा दर्जा मिळावा हे आमचे ध्येय असून या दृष्टीने आम्ही पाऊले टाकायला सुरुवात करणार आहोत. वर नमूद सेंटर ऑफ एक्सलन्स बरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि हाय परफॉर्मंस सेंटरही उभारण्यात येईल. या ठिकाणी खेळाडूंना आवश्यक न्यूट्रिशन, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, स्पोर्ट्स थेरपी, स्पोर्ट्स सायंटिस्ट, बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स सायकॉलॉजी आदी बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच या विषयांसंबंधी अभ्यासक्रम सुरु करून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नजीकच्या भविष्यात आमच्या महाविद्यालायांमध्ये बीबीए सारखे अभ्यासक्रम देखील सुरु केले जातील. सध्या वाणिज्य शाखेचे पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहितीही गोखले यांनी दिली.
शताब्दी वर्षात पदार्पण करीत असताना येत्या विजयादशमीला अर्थात मंगळवार दि २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता टिळक रस्त्यावरील संस्थेच्या आवारातून शोभायात्रेला सुरुवात होईल, असे सांगत रोहन दामले म्हणाले की, “संस्थेच्या आवारातून निघालेली शोभायात्रा अभिनव चौकापर्यंत जाईल. या शोभायात्रेत संस्थेतील विद्यार्थ्यांची योगासने, मल्लखांब, लेझीम, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके होतील. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर बसविलेले पथनाट्य हे शोभायात्रेचे आकर्षण असेल.”
शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांसोबतच संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर वर्ग असे सर्वच जण सहभागी होतील. पुढे मुकुंदनगरच्या मुख्य चौकापासून मुकुंदनगर येथील संस्थेचे आवार असा शोभा यात्रेचा दुसरा टप्पा संपन्न होईल. त्यानंतर मुकुंदनगर येथील संस्थेच्या सभागृहात शोभायात्रेचा समारोप होईल.”
याखेरीज पहाटे पाच वाजता टिळक रस्त्यावरील संस्थेच्या आवारात परंपरेप्रमाणे जोर मारण्याचा कार्यक्रम होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी आजवर १५० जणांनी नोंदणी केली असून जो स्पर्धक एक हजार जोर मारेल त्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रीय मंडळातर्फे शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यामध्ये देशी किंवा भारतीय खेळांवर आधारित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, योगा विषयावरील मोठी परिषद व आशियाई देशांमधील देशी खेळांची प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांचा समावेश असेल. संस्थेच्या स्थापनेचा मूळ हेतू लक्षात घेत नजीकच्या भविष्यात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी असलेल्या निवड प्रक्रियेला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठीची यंत्रणा उभारण्याचा देखील संस्थेचा मानस आहे, अशी माहिती रोहन दामले यांनी दिली.
