संगम घाटावर १२१ बेवारस अस्थींचे विसर्जन
पुणे : राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने १२१ बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून संगम घाटावर विसर्जन करण्यात आले. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सलग १३ व्या वर्षी पुणे शहरातील बेवारस अस्थींचे विसर्जन राष्ट्रीय कला अकादमीच्या पुढाकाराने होत आहे.
सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, अमर लांडे, राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणेच्या संचालिका रोमा लांडे ,अतुल सोनवणे, सुनील सोनटक्के सहाय्यक आयुक्त अशोक झुळूक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे, आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे, मुकादम नागेश बराथे, दिनेश परमार, नागेश लांडगे, मिलिंद भोई, मेघा चिंतन, विश्वास भोर, नितीन पंडित , पियूष शहा ,बाला शुक्ला, अश्विनी आपाली , योगेश जाधव उपस्थित होते.
अमर लांडे म्हणाले, हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थी नदीमध्ये सोडणे बंधनकारक आहे. तरच आत्म्यास मोक्ष प्राप्ती होते. परंतु शहरात विविध कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये अनेक मृतदेह बेवारस असतात. अशा बेवारस मृतदेहांचे अस्थी विसर्जन कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या मृत व्यक्तीची जात किंवा धर्म कोणता हे न बघता, त्या पलीकडे जाऊन अकादमीच्यावतीने या बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
सदाशिव कुंदेन म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जाते. उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास मोक्ष प्राप्ती यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
