Sunday, June 14, 2026
Latest NewsSports

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून परतलेल्या कबड्डी संघातील खेळाडू स्नेहल शिंदेची उस्फूर्त मिरवणूक

पुणे – आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहेच. पण कबड्डी परदेशातही चांगलीच फोफावत असल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू स्नेहल शिंदे हिने व्यक्त केली.
आशियाई स्पर्धेतील सुवर्णयशानंतर स्नेहल बुधवारी पुण्यात परतली. त्यानंतर गुरुवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून स्नेहलच्या माहेरच्या घरापर्यंत म्हणजे खडक पोलिस लाईन पर्यंत उघड्या जीपमधून स्नेहलची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणूकीला पुणेकरांनी उस्फूर्त दाद दिली. आपली मुलगी सुवर्णपदक जिंकून परतलीये, त्यामुळे जरा थांबून तिचे स्वागत केले, अभिनंदन केले तर बिघडले कुठे असे म्हणत पुणेकरांनी रस्त्यात थांबून स्नेहलचे स्वागत केले. वहातुकीच्या खोळंब्याचा कुठलाही त्रास त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. विशेष म्हणजे शाळेत जाणारे आणि सकाळी शाळा सुटून घरी जाणाऱ्या मुलांनीही ओरडत, भारत माता की जय अशा घोषणा देत स्नेहलचे कौतुक केले. स्नेहलली या सर्वांना कधी हात हलवून, तर कधी आपले सुवर्णपद उंचावून अभिवादन करत होती. मिरवणूकीची सांगता झाली तेव्हा तिच्या राजमाता जिजाऊ शाळेच्या मुलींबरोबर जल्लोषात सहभागी होत स्नेहलने डान्सही केला. संपूर्ण मिरवणूकीत  नवरा सागर साखरे, सासू स्वाती साखरे, मामा अजय चिंचवडे, किरणी पाटील, भाऊ निखिल शिंदे, वडिल प्रदीप शिंदे, आई सुरेखा शिंगे, पूनम शिंदे, भाऊ पृथ्वीराज चिंचवडे, केश पाटील, अजय शिंदे असे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी
खडक लाईन येथे मिरवणूक संपल्यानंतर स्नेहलशी संवाद साधला असता, तिने आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. इंडोनेशियात  ते पूर्ण होऊ शकले नाही, पण या वेळी ते साकार झाल्यावर सुवर्णपदक घेऊनच मायदेशी यायचे ही खूणगाठ मनाशी बांधली होती. ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही सुवर्णपदक मिळविले खूप आनंद वाटला. देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजण्यात आपण कारणीभूत ठरलो याचा विजयमंचावर उभे राहिल्यावर अभिमान वाटला, असे स्नेहल म्हणाली.
कबड्डीत खरे तर भारताला आव्हान नाही इतकी आपली मक्तेदारी होती ती परत मिळवायला आवडेल. पण, आधी इराण आणि आता तैवान संघ पूर्ण तयारीने उतरले होते. त्यांची तयारी चांगली होती. त्यामुळे सुवर्णपदकाबरोबर कबड्डी परदेशात चांगली फोफावत असल्याचे पाहून आनंद द्विगुणित झाला, असेही स्नेहलने सांगितले.
स्नेहल भारताची यापूर्वीची आशियाई आणि जागतिक कबड्डी विजेत्या संघातील खेळाडू किशोरी शिंदेची बहिण. एकाच घरात दुसरे आशियाई सुवर्णपदक आल्याबद्दल कसे वाटते असे विचारल्यावर स्नेहल म्हणाली, नक्कीच आनंद झाला. किशोरीनेच मला कबड्डीच्या मैदानावर आणले. तिला घडताना, तयारी करताना पाहून मी मैदानात उतरले आणि तिच्या पाठोपाठ तिचाच आदर्श ठेवत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. त्याचबरोबर आता झालेले स्वागत आणि पुणेकरांची दाद पाहून खूप भारावून आले, असे स्नेहल म्हणाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading