आठ महिन्याच्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई लढली बिबट्याशी
आंबेगाव : रात्रीच्या अंधारात बिबट्या आपल्या आठ महिन्याच्या पोटच्या गोळ्याला ओढून घेवून जात असताना जाग आलेल्या आईने चक्क बिबटयाशीच लढत बाळाचे प्राण वाचवल्याची थरारक घटना समोर आली आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळा येथे आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या झटापटीत बाळ जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातही बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याची ही सलग दुसरी घटना आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवा करगळ असे जखमी झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ, त्याची पत्नी सोनल करगळ आणि त्यांचा आठ महिन्याचा मुलगा देवा हे वाड्याच्या बाहेर झोपले होते. रात्री दोनच्या सुमारास मेंढ्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्याची नजर करगळ यांच्या आठ महिन्याच्या बाळावर पडली. तेव्हा शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्या या आठमहिन्याच्या बाळाच्या हाताला पकडून घेवून जावू लागला. सुदैवाने नेमकी तेव्हाच बाळाच्या आईला जाग आली. अन् प्रसंगावधान दाखवत या आईने जिवाच्या आकांताने बाळाला वाचवण्यासाठी एका हाताने बाळाले खेचले तर दुसऱ्या हाताने बिबट्याच्या जबड्याला पकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिच्या आरडाओरड्याने बाजूच्या लोकांनाही जाग आली. अन् लोकांना पाहून बिबट्याने पळ काढला. या प्रकारात बाळाच्या हाताला बिबट्याचे दात लागले आहेत. तर पोटावर पज्यांची नख लागली आहेत. पहाटे या बाळाला मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले गेले आहे.
दरम्यान, बिबटयाचा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन कर्मचाऱ्यांनी सकाळी येऊन घटनास्थळी भेट दिली आहे.
