PMP च्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) व बक्षिस रक्कम दिली जाते. त्याप्रमाणे यावर्षी देखील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मा. संचालक मंडळाच्या दि. ११/१०/२०२३ रोजीच्या ठरावाच्या मान्यतेने मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३٪ प्रमाणे सानुग्रह अनुदान व रूपये २१,०००/- इतकी बक्षिस रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे.
सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करणेत येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम जाहीर झाल्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे. दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने सचिन्द्र प्रताप सिंह यांनी प्रवासी दि, प्रवासी मित्र. डेपोनिहाय पालक अधिकारी असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत.
पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या ३ महिन्यांत जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
-सचिन्द्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
