मनसे नेते वसंत मोरे यांना व्हायचे आहे खासदार; मिळाली लाल दिव्याची अॅम्बेसिडर
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सतत संपर्कात असतात. आता त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना साकडे घातले आहे. परंतु आता त्यांना लाल दिव्याची अॅम्बेसिडर गाडी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
वसंत मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात त्यांचे बॅनर्स लागले आहेत. त्या बॅनरवर भावी खासदार म्हणून वसंत मोरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात किंग ऑफ पुणे वसंत मोरे म्हटले आहे. त्यांच्या त्या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरू असताना आता त्यांना लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. वसंत मोरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाल दिव्याची अॅम्बेसिडर गिफ्ट दिली आहे.
लाल दिव्याची अॅम्बेसिडर वसंत मोरे यांना अखिल मोरे बाग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे. पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आता लाल दिव्याची गाडी भेट दिल्यामुळे खासदारकीसोबत मंत्रिपदाचेही स्वप्न वसंत मोरे यांना पडू लागले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
