पहिल्या ‘फिनिक्स् करंडक’ अजिंक्यपद प्रौढ गट टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!
पुणे : फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब तर्फे पहिल्या ‘फिनिक्स् करंडक’ अजिंक्यपद प्रौढ गट टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४० वर्षावरील प्रौढ वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ६ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि संयोजक श्रीनिवास सरवदे, प्रफुल्ल मानकर, सचिन जयवंत, सौरभ रवालिया, शैलेश देशपांडे, सचिन कापडे, अनिल मांडके, प्रशांत घेवारी, महेश शिंदे आणि स्नेहलकुमार कासार यांनी सांगितले की, विश्वकरंडक स्पर्धेमुळे सगळेच वातावरण हे क्रिकेटमय होणार आहे. यामुळे केवळ क्रिकेट पाहून आनंद घेण्यासोबतच क्रिकेट खेळून वर्ल्ड कप साजरा करूयात, असा आमचा मानस आहे. प्रौढ क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी फिनिक्स् करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा.शिंदे हायस्कूल मैदान आणि स्केल-अप मैदान, वारजे येथे खेळविण्यात येणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या टी-२० स्पर्धेत फ्रेन्डस् क्रिकेट क्लब, बीकेसी क्लब, फिनिक्स् क्रिकेट क्लब, रायगड वॉरीयर्स, जेडब्ल्यु मॅजिशियन, युनिक क्रिकेट क्लब, लायन्स् क्रिकेट क्लब, न्युट्रीलिशीयस क्रिकेट क्लब या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
श्रीनिवास सरवदे पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षिस व करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन चित्रपट आणि नाट्य अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेमध्ये अंध मुलांच्या संघांचा एक प्रदर्शिनीय सामनाही खेळविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचे सामने हे युट्युब लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.
