भारत सरकारने ६ जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन जाहीर करावा
पुणे : शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा वैश्विक साजरा व्हावा, या प्रेरणेतून ६ जून २०१३ रोजी सर्वप्रथम सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ६ जून शिवराज्याभिषेक हा दिन भारत सरकारने राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक आणि शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे.
अमित गायकवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी ६ जून शिवराज्याभिषेक हा दिवस सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून शासकीय परिपत्रक काढून आपआपल्या मंत्रालयातर्फे साजरा करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतन आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली. समिती तर्फे महाराष्ट्रातील तब्बल ३५० किल्ल्यांवर हा दिवस सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळां तर्फे सुध्दा हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.
अमित गायकवाड म्हणाले, जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज पुत्र युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारताच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू. शतको न शतके उलटून गेली तरी भारताला प्रेरणा देणारा चिरंजीव मंत्र. शिवराय म्हणजे भारतभूमीला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देऊन भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे नवसंजीवन दाते. शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समाधानाने भरली.
ज्याप्रमाणे शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते त्याप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा होत नव्हता, रायगडा पुरताच मर्यादित राहिला होता. आणि ६ जून हा दिवस शिवजयंती प्रमाणे वैश्विक साजरा व्हावा यासाठी सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ६ जून २०१३ पासुन सुरुवात झाली.
शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलावर, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्यचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन हा दिवस साजरा करण्यास गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरुवात झाली. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलावर, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्यचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्यगुढी या दोनही अभिनव संकल्पनांना २०२१ साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी शासकिय परिपत्रक काढून मान्यता दिली. त्यामुळे लोकमान्य पावलेली ही संकल्पना राजामान्य झाली.
म्हणूनच यंदा साजरा होणा-या ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षात ६ जून हा दिवस शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलावर, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्यचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून भारत सरकाराने जाहीर करावा, अशी मागणी अमित गायकवाड यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत टपाल टीकीट आणि नाणी सुध्दा भारत सरकारने प्रकाशित करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
शिवजंयती महोत्सव समितीचे सचिव सचिन पायगुडे, उपाध्यक्ष रवींद्र कंक, किरण साळी, समीर जाधवराव, शंकर कडू, निलेश जेधे, गोपी पवार, मंगेश शिळीमकर, प्रदीप मरळ, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांनी देखील हे आवाहन केले आहे.
