क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी, ३० यार्डस् क्रिकेट अॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय !!
पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी आणि ३० यार्डस् क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत युग सोनिग्रा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीचा १४ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीने १४६ धावांचे आव्हान उभे केले. युग सोनिग्रा (३२ धावा), अन्श सांगवी (नाबाद ३५ धावा) आणि श्रवण देसाई (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. सहाव्या गड्यासाठी युग आणि अन्श यांनी ३७ चेंडूत ६८ धावांची भागिदारी करून संघाला १४६ धावांचे आव्हान उभे करण्यास मदत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३२ धावांवर मर्यादित राहीला.
विहान सुतार याच्या कामगिरीच्या जोरावर ३० यार्डस् क्रिकेट अॅकॅडमीने ए.के. स्पोर्टस् संघाचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० यार्डस् क्रिकेट अॅकॅडमीने स्वराज शेलार (२७ धावा) आणि विहान सुतार (नाबाद ३६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६३ धावांचे आव्हान उभे केले. ए.के. स्पोर्ट्स संघाचे सलामीवीर पृथ्वीराज खांडवे (५४ धावा) आणि राजवीर देशमुख (४९ धावा) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर संघाला आवश्यक धावगती राखता आली नाही. एके स्पोर्ट्स सघाचा डाव १४५ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १४६ धावा (युग सोनिग्रा ३२, अन्श सांगवी नाबाद ३५, श्रवण देसाई २६, ताहीर अली २-३१);(भागिदारीः सहाव्या गड्यासाठी युग आणि अन्श ६८ (३७) वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १३२ धावा (कुलवंश वाकोडे २९, आर्यन पेंडसे २०, युग सोनिग्रा १-१८); सामनावीरः युग सोनिग्रा;
३० यार्डस् क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद १६३ धावा (स्वराज शेलार २७, विहान सुतार नाबाद ३६, श्रेय असलेकर १७, सोहम सावंत ४-१८) वि.वि. ए.के. स्पोर्ट्सः २५ षटकात ५ गडी बाद १४५ धावा (पृथ्वीराज खांडवे ५४ (४०, ११ चौकार), राजवीर देशमुख ४९, विहान सुतार २-२१); सामनावीरः विहान सुतार;
