रघुनंदन पणशीकर आणि शौनक अभिषेकी यांच्या जुगलबंदीने जिंकली पुणेकर रसिकांची मने
डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले. यावर्षी डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले आहे. भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, मंडळाच्या सचिव सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉ. स्वाती दैठणकर, कथक गुरू मनीषा साठी, भरतनाट्यम नृत्यांगना व अभिनेत्री नुपूर दैठणकर आणि तरुण पिढीचे आश्वासक संतूरवादक निनाद दैठणकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
जुगलबंदी आधी शौनक अभिषेकी व रघुनंदन पणशीकर यांनी एकल गायन प्रस्तुत केले.
यावेळी शौनक अभिषेकी यांनी राग सरस्वतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी रुपक तालात ‘रैन की बात’ हा ख्याल सादर केला. यानंतर ‘सजन बिन कैसे…’ ही द्रुत अद्धा तीन तालातील बंदिश प्रस्तुत केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा आणि विश्वजित मेस्त्री (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यानंतर रघुनंदन पणशीकर यांनी सतारवादक शंकर अभ्यंकर यांनी बांधलेली रागेश्री रागातील ‘श्याम दरस कैसे पाऊं..’ ही बंदिश सादर केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, अश्विनी पुरोहित, शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या शेवटी रघुनंदन पणशीकर आणि शौनक अभिषेकी यांनी ‘बाजे रे मुरलीया बाजे… ‘ आणि ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे अभंग एकत्रित सादर करीत आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला.
डॉ स्वाती दैठणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर निरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महोत्सवामध्ये उद्या (सोमवार दि. १ मे) रोजी सायं ६ वाजता आर्या आंबेकर आणि सहकारी यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर व त्यांचे शिष्य व सुपुत्र निनाद दैठणकर यांचा संतूर जुगलबंदीचा अनोखा प्रयोग होईल. यावेळी उस्ताद अल्लारखां आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचे शिष्य असलेले आदित्य कल्याणपूर हे त्यांना तबलासाथ करतील. दुसऱ्या दिवसाचा आणि महोत्सवाचा समारोप बंगळूरूस्थित भरतनाट्यम नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या सादरीकरणाने होईल. संगीत नाटक अकादमीच्या बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित पार्श्वनाथ उपाध्ये हे आपल्या ‘मार्गम्‘ या नृत्य कार्यक्रमाचा प्रीमियर यावेळी पुणेकर रसिकांसमोर प्रस्तुत करणार आहेत.
