चित्रकार आनंद जोग यांचे चित्रप्रदर्शन म्हणजे बिंदूमागील चिंतनाची अनुभूती देणारी कलाकृती – प्रा. डॉ. विश्वनाथ कराड
पुणे : संत तुकाराम महाराजांच्या ‘अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ।।’ या अभंगामध्ये एका बिंदूची महती त्यांनी विशद केली आहे. या एका लहान बिंदूमागे मोठा सिद्धांत आहे. त्याग केल्यावर समर्पण मिळते याच प्रकारे ध्यासाने एखादी कला आयुष्यात जपली तर कलेद्वारे मिळणारी अनुभूती ही आयुष्य समृद्ध करणारी असते. चित्रकार आनंद जोग यांचे हे प्रदर्शन बिंदूमागील त्यांच्या चिंतनाची अनुभूती देणारी कलाकृती असल्याचे प्रतिपादन माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालन येथे आयोजित चित्रकार व पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आनंद जोग यांच्या ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ कराड यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
आपली आवड जोपासत एखाद्या छंदाचा ध्यास घेत आनंद जोग यांनी आपल्या नजरेतून समाजाचे वैभव व स्वरूप जगासमोर मांडण्याचा केलेला हा यशस्वी प्रयत्न असल्याचे सांगत प्रा डॉ विश्वनाथ कराड म्हणाले, “ही चित्रे रेखाटत असताना जोग यांनी करोडो बिंदू काढले असतील. बिंदू मागील कल्पनेची अनुभूती आल्याशिवाय हे होणे शक्य नाही. याच अनुभूतीचे दर्शन इतरांना ही चित्रे पाहताना येत आहे याचा आनंद आहे. जीवनाचे वेगळे दर्शन यातून घडत आहे, हीच अनुभूती आज मीही घेतली.”
आपल्या संस्कृतीत बिंदुला एक महत्त्वाचे रुप मानले गेले आहे. याबरोबरच बिंदू आणि रेषा यांच्या माध्यमातून काम करण्यासाठी सहनशीलता आवश्यक आहे. आनंद जोग यांनी साकारलेले हे प्रदर्शन त्यांच्या समृद्ध संवेदनेचे प्रतीक असल्याचे मत डॉ संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
