‘कीप आर्ट अलाईव्ह’ चित्रप्रदर्शनात रसिकांना मिळणार पेन व शाईच्या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी
पुणे : चित्रकार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आनंद जोग यांनी पेन आणि शाई या माध्यमातून रेखाटलेली तब्बल ३५० हून अधिक सुरेख चित्रे पाहण्याची संधी पुणेकर कलारसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या अनोख्या चित्रप्रदर्शनाचे. विशेष म्हणजे एकाच चित्रकाराने एकाच माध्यमात रेखाटलेल्या चित्रांचे इतक्या मोठ्या स्वरूपातील हे जगातील बहुधा पहिलेच प्रदर्शन असणार आहे.
हे प्रदर्शन शुक्रवार दि. २१ एप्रिल ते रविवार दि २३ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. या प्रदर्शनासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य असेल. शुक्रवार दि २१ एप्रिल रोजी सकाळी १० वा. माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
आपल्या चित्रकलेच्या आवडीबाबत बोलताना आनंद जोग म्हणाले, “शाळेत असताना मला प्रसिद्ध चित्रकार अरुण फडणीस हे शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांच्यामुळे चित्रकलेची गोडी लागली. पुढे या विषयातील एलिमेंटरी आणि इंटरमिजीएटरी परीक्षा दिली होती. मात्र नंतरच्या काळात चित्रकलेसाठी फारसा वेळ देता आला नाही. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना, या कौशल्याचा खूप उपयोग झाला. २००२ साली मी कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये प्रसिद्ध चित्रकार मारिओ मिरांडा यांचे एक चित्र पाहिले, घरी आल्यावर मी छोट्या स्वरूपात ते चित्र रेखाटले ते माझ्या कुटुंबीय आणि मित्रांना अतिशय आवडले होते. त्यानंतर मी मिरांडा यांची आणखी काही चित्रे रेखाटली आणि त्यांची गोवा येथे जाऊन भेट घेतली. त्यांनाही मी रेखाटलेली चित्रे खूप आवडली आणि मी यापुढेही चित्र काढत, राहावे असे सांगितले. त्यातूनच माझा चित्रकलेचा प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला.
पुढे मी मूर्तीकार डी एस खटावकर यांच्याकडे चित्रकलेचे अनौपचारिक शिक्षण घेतले. माझे पहिले चित्रप्रदर्शन हे त्यांच्यासाठी माझी गुरुदक्षिणा होती. चित्रकलेचा हा प्रवास आजही सुरु असून, खासकरून पेन आणि शाई या माध्यमातून रेखाटलेली चित्रे मला अधिक आवडतात, कारण ब्लॅक अँड व्हाईट या रंगांशी मी अधिक जोडला गेलो आहे. कोणतेही चित्र रेखाटताना त्याची प्रतिमा याच रंगांमध्ये मी व्हिज्युअलाईज करतो. त्यामुळे हे रंग आणि हे माध्यम मला अधिक भावते.’’
