डीसीएम सोसायटी ऑफ इंडियामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पुणे : नाना पेठेतील डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डी.टी. रजपूत, जनरल सेक्रेटरी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, काजल शेवाळे, वर्षा पाटील, मुख्याध्यापिका शिल्पा भोसले, सुनिता भोसरेकर, डॉ. जे. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, कार्यालयीन अधीक्षक किशोर भुजबळ, डॉ. बाळासाहेब सोनवणे, संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांनी सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्षेत्रात केलेली क्रांती उल्लेखनीय आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बाबासाहेबांचे विचार सर्व समावेशक होते. बाबासाहेबांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य केले. शैक्षणिक गुणवत्तेच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या देशामधील विद्यापीठामध्ये व परदेशातील विद्यापीठांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेले पहिले होते. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ म्हणून त्याची नोंद झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष.डी.टी रजपूत यांनी सांगितले, की बाबासाहेबांचा विचार आजच्या प्रत्येक युवकाने अंगीकारला पाहिजे. आंबेडकरी चळवळीचा एक भाग झाला पाहिजे. आंबेडकरी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आजच्या तरुण युवकाचे आहे.
प्रास्ताविक प्रा. प्रणाली भोसले यांनी, सूत्रसंचालन प्रा. सरिता भंडारी यांनी, तर आभार प्रा. सानिया सय्यद यांनी मानले.
