ऐतिहासिक दामोदर व्हॅलीतील मैथन डॅम येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण
धनबाद – बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज जयंतीदिनी ऐतिहासिक दामोदर व्हॅली झारखंड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी धनबाद चे खासदार पी एन सिंग; आमदार अपर्णा सेनगुप्ता ;भदंत पिसावरो बाबा पानसरे ; आर पी आय झारखंड अध्यक्ष डब्ल्यू महतो; चंदन शर्मा ; डब्ल्यू बावरी; मृत्युंजय मलिक;देबाशीष दास आदी मान्यवर उपस्थित होते.
दामोदर नदीवरील 7 धरणे बांधून तयार करण्यात आलेल्या दामोदर व्हॅलीची निर्मिती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सरकारमध्ये 1943 मध्ये श्रम; वीज आणि जल सिंचन मंत्री असताना करण्यात आली. त्यामुळे दामोदर व्हॅलीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी ना.रामदास आठवले यांनी 2019 मध्ये मागणी केली होती. त्यानुसार दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
