Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

हनुमान भक्तीतून रंगली संगीतमय ‘श्रीमद सुंदर कांड कथा’

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम… पवनसूत हनुमान की जय चा जय घोष… बासरीच्या सुमधूर स्वरांनी निर्माण झालेले भक्तीवलय… भक्तीमय वातावरणात रंगलेली हुनमानाची भक्ती कथा.. रावणाची बलाढ्य लंका आपल्या शेपटीने जाळून बलशाली हनुमानाने केलेले शक्तीचे दर्शन… अशा विविध प्रसंगांमधून श्रीरामभक्त हनुमंताच्या भक्ती शक्तीचे वर्णन करणारी सुंदरकांड कथा रंगली.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे भगवान श्री हनुमानाच्या चरणी श्रीमद सुंदर कांड – संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले. श्री महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात प.पू. वीरेंद्र यागनिक यांनी निरुपण केले. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, रमेश पाटोदिया, तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प.पू. वीरेंद्र यागनिक म्हणाले, श्रीराम चरित मानस या संत तुलसीदास यांचे पाचवे कांड म्हणजे सुंदर कांड कथा आहे. हनुमंतांच्या विविध लिला आणि शक्तीचे वर्णन यामध्ये करण्यात आले आहे. हनुमानाची विजय यात्रा आणि महाबलीच्या जीवनातील विविध प्रसंगांचे आरसा म्हणजे हे सुंदर कांड. सुंदर कांड कथेच्या वाचन किंवा श्रवणाने माणसाला जीवनात कधीही हार मानायची नाही, ही शिकवण मिळते.

ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे रामचरितमानस हे भगवान श्रीरामांचे गुण आणि त्यांच्या पुरुषार्थ दर्शविणा-या प्रसंगांनी परिपूर्ण आहे. त्याचप्रमाणे सुंदर कांड हा एकमेव असा अध्याय आहे, ज्यामध्ये भक्ताचा विजय पहायला मिळतो. माणसाचे दु:ख निराकरण करण्याकरिता तसेच मानसिक शांती प्राप्त करण्याकरिता सुंदर कांड उपयुक्त आहे. कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणा-या हनुमान या देवतेच्या सुंदर कांड या अध्यायाचे श्रवण व वाचन प्रत्येकाने करायला हवे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading