fbpx

सावधान : H3N2 विषाणूचे भारतात दोन बळी

नवी दिल्ली: करोना नंतर आता H3N2 विषाणूने नागरिकांना हैराण केले आहे. अनेकांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. मात्र, आता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण H3N2 विषाणूमुळे होणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली. एकाचा कर्नाटकात तर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मार्च अखेरीस या प्रकरणांमध्ये घट होण्याची अपेक्षा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.  

H3N2 मुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना ही कर्नाटकात घडली आहे. कर्नाटकातील हसन येथील हिरे गौडा (वय 82) यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तर दुसऱ्या मृत्यूची नोंद ही हरियाणात झाली आहे. येथील 56 वर्षीय रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. ज्याची जानेवारीमध्ये H3N2 चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 8 मार्च रोजी त्यांचे निधन झाले.

गेल्या काही महिन्यांपासून देशात फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बहुतेक संक्रमण H3N2 विषाणूमुळे होत आहे. ज्याला “हाँगकाँग फ्लू” देखील म्हणतात. या विषाणूमुळे देशातील इतर प्रकारच्या फ्लूपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. देशात H3N2 विषाणूची सुमारे 90 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. H1N1 विषाणूचे आठ रुग्णही आढळून आले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: