चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय
पिंपरी : चिंचवड आणि पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून चर्चेत होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्तासंघर्षाचे परिणाम पुणे पोटनिवडणुकीवरही पाहायला मिळाले. अखेर चिंचवड मतदारसंघात भाजपचीच सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान होते. महाविकास आघाडीला या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या ३७ व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. अश्विनी जगताप या ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजयी झाल्यात.
