पेट्रोलियम क्रीडा मंडळाला विजेतेपद
पुणे : पेट्रोलियम क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देत आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या लढतीत मात्र त्यांना मणिपूरचा प्रतिकार सहन करावा लागला. पेट्रोलियम क्रीडा मंडळाने अंतिम लढत ३-२ अशी जिंकली.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ७५ वी आंतरराज्यीय आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार प्रसाद लाड, बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष एस. मुरलीधरन, ओमर राशीद, श्रीकांत वाड, पीडीएमबीएचे आनंद जोशी, रणजीत नातू, गिरीश नातू यांच्या उपस्थितीत झाले.
विजेत्या संघास पाच लाख रुपयांचे पारितोषिक तर उपविजेत्या संघाला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावरील संघांस एक लाख २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
गतविजेत्या एअरपोर्ट अॅथॉरिटी संघाला पराभूत केल्यानंतर मणिपूरने अंतिम फेरीतही आपली चमक दाखवली. सकाळच्या सत्रात झालेल्या अंतिम लढतीत मणिपूरने मिश्र दुहेरी आणि एकेरीची लढत जिंकून झकास सुरुवात केली होती.
मिश्र दुहेरीत डिंकू सिंग कोंथौजाम – प्रिया देवी कोजेंगबाम जोडीने कमालीच्या संयमाने खेळ करताना पेट्रोलियम मंडळाच्या मनु अत्री – अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीचा २०-२२, २१-१८, २१-१५ असा पराभव केला. ही लढत १ तास ५ मिनिटे चालली होती. डिंगूची आक्रमकता आणि प्रियाचा नेटवरील खेळ हे या जोडीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर दोघांमधील समन्वय कमालीचा होता. मनु आणि अश्विनी या अनुभवी जोडीसमोर खेळताना त्यांनी दाखवलेला संयम देखील तेवढाच महत्वाचा ठरला. त्यानंतर पुरुष एकेरीच मैस्नाम मेईरबाने मणिपूरची आघाडी वाढवली. पेट्रोलियम मंडळाने या वेळी एकेरीत प्रणॉयच्या जागी सौरभ वर्माला खेळवले. पण, सौरभलाही पराभवाचा सामना करावा लागला. मेईरबाने ५१ मिनिटात २६-२४, २१-१४ असा विजय मिळविला.
विजेतेपदाच्या लढतीत २-० अशी आघाडी मिळविल्यावर मणिपूरच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावणे अपेक्षित होते. पण, येथे पुन्हा एकदा अनुभवाची बाजू वरचढ ठरली.
महिला एकेरीत अस्मिता छलिहाने मणिपूरच्या माहेश्वरी देवी क्षेत्रीयमायुमचे आव्हान २१-१०, २५-२३ असे परतवून लावले. पुढे मनुने चिराग शेट्टीच्या साथीत खेळताना मनजित सिंग ख्वायराक्पाम-डिंकू सिंगचा प्रतिकार २१-६, २१- १७ असा मोडून काढला. महिला दुहेरीत माहेश्वरीच्या साथीत खेळताना पुन्हा एकदा प्रियाने प्रयत्नांची शिकस्त केली. पण, एन. सिक्की रेड्डी-अश्विनी पोनप्पाच्या अनुभवाला ते छेद देऊ शकले नाहीत. सिक्की-अश्विनीने २१-१९, २१-१० असा विजय मिळवून पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
