Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सेवेमध्ये करुणेपेक्षा संवेदनेला महत्त्व – भैयाजी जोशी

पुणे  : करुणेचा भाव आणि संवेदना यामध्ये सूक्ष्म भेद आहे. करुणा या भावनेत ‘मी’ पणा आहे. मात्र मला जे मिळाले ते पुढे समाजाला द्यायचे आहे. मला समाजात दिसत असलेल्या अडचणी, संकटे, दुःख दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे ही संवेदना सेवेमध्ये महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मांडले. सेवावर्धिनी या सेवाभावी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत पुण्यात ‘सेवा तरंग’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्वयंसेवी संस्था परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेचे उद्घाटन आज जोशी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

सेवावर्धिनी, मुकुल माधव फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा तरंग’ ही राज्यस्तरीय परिषद आज व उद्या वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होत आहे. राज्यभरातील सेवाभावी संस्थांशी संवाद साधत विचारांचे आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सेवावर्धिनीचे मानद अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कार्याध्यक्ष किशोर देसाई, कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, आमदार सुनील कांबळे, परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधीर मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे सौरभ धानोरकर, पर्सिस्टंट फाउंडेशनच्या योगिता आपटे आणि प्राज फाउंडेशनचे मंदार पोफळे आदी या वेळी उपस्थित होते.

सेवावर्धिनी संस्थेच्या मागील २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘सेवेची भारतीय संकल्पना’ या विषयावर बोलताना भैयाजी जोशी म्हणाले, “ईश्वराची पूजा ही केवळ पाणी, फुले, कुंकू वाहून होत नाही तर एखाद्या पिडीत, वंचित व्यक्तीची सेवा ही ईश्वरसेवा आहे हेच भारतीय संस्कृतीत सांगितले गेले आहे. सेवा करताना केवळ व्यवस्था उभी करणे हा उद्देश तोकडा आहे. त्या सेवेने समोरील व्यक्तीचे जीवन बदलावे, त्यामध्ये परिवर्तन यावे आणि चांगले भौतिक आयुष्य जगण्याची नवी उर्मी त्या व्यक्तीमध्ये यावी हा त्याचा उद्देश आहे. म्हणूनच दुसऱ्यांचे दुःख ज्याला समजते त्यालाच ईश्वरभक्ती चे मर्म समजले असे म्हणता येईल आणि त्यासाठी मातृ ह्दय असणे आवश्यक आहे.”

विकासाची कामे ही योजनेने होतात. सेवेची कामे ही योजना बनवून होत नाही. दृश्य पाहिल्यावर अंत: करणात जो भाव निर्माण होतो त्यामधून संवेदना आणि सेवा येते आणि त्यासाठी दृष्टी ही महत्वपूर्ण असते, असे सांगत भैयाजी जोशी पुढे म्हणाले, ”आपल्याकडे सेवा आणि व्यवस्था उभारणी यामध्ये गल्लत केली जाते. सेवा म्हणजे  आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देणे नसून तो त्याचा एक भाग आहे. सेवा ही साधनांच्या उपलब्धतेने नव्हे तर संवेदनेने करता येते. भारतात आज अंदाजे २० ते २५ कोटी जनता हलाखीचे जीवन जगत आहेत असा वर्ग डोळ्यासमोर ठेऊन परोपकाराच्या, करुणेच्या पलीकडे संवेदनेच्या भावनेने काम करीत त्यांना चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे.”

महात्मा गांधींकडे साधनांची कमतरता नव्हती पण त्यांच्या ठायी संवेदनेचा भाव होता आणि म्हणूनच ते सेवाग्राम आश्रमात स्वतः रुग्णांची सेवा करीत असे उदाहरणही भैयाजी जोशी यांनी दिले.

समाजासाठी एखादे काम केल्यावर मला सन्मान मिळेल, सत्कार होईल ही विकृती आज मोठ्या प्रमाणात दिसून येते जे एक वेगळ्या दिशेने करावयाचे चिंतन आहे. मात्र अशांनी एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे ती म्हणजे तुमच्या सेवेने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि तो दिल्याने तुम्हाला मिळालेले समाधान हे सत्कारापेक्षा खूप मोठे आहे, असे मला वाटते आणि म्हणूनच देणारे आणि घेणारे होण्यापेक्षा सेवा करणारे व्हा असे आवाहन भैयाजी जोशी यांनी केले. संवेदनेची ही जाणीव हा संस्काराचा, जागरणाचा विषय आहे, असेही जोशी यांनी सांगितले.

कोणत्याही सेवाभावी संस्थेच्या मूळ उद्देशाला धक्का न लावता सेवावर्धिनी गेली २५ वर्षे एका दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहे, असे सांगत डॉ प्रमोद चौधरी म्हणाले, “आज सामाजिक संस्थांनी काम करीत असताना प्रकल्प, त्यांचा वेग, आर्थिक मदत आणि प्रकल्पासाठी आवश्यक मानांकने यांकडे देखील लक्ष द्यावे. सेवावर्धिनी ने देशपातळीवर आपला एक ब्रँड तयार करण्यासाठी नजीकच्या भविष्यात मार्गक्रमण करावे, अशी माझी अपेक्षा आहे.” सेवावर्धिनीच्या कामाने नवा भारत उदयास येईल असा विश्वास डॉ. चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.  

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी ग्रामीण भागात आजही विकासाची गरज आहे, आणि सेवावर्धिनी तेच काम करीत आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी देखील सेवावर्धिनीच्या उपक्रमात सहभागी होत राहील, असे सुनील कांबळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधीर मेहता व इतर मान्यवरांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. सेवावर्धिनीचे सहकार्यवाह माणिक दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सोमदत्त पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading