Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभविला पंडित सुखविंदरसिंह नामधारी यांच्या पारंपारिक तबला व जोडीवादनाचा अनोखा कार्यक्रम

पुणे  : पंडित सुखविंदरसिंह नामधारी यांनी सादर केलेले बनारस घराण्याचे पारंपारिक व दमदार असे तबलावादन आणि जोडीवादन यांचा अनोखा कार्यक्रम आज पुणेकर रसिकांनी अनुभवायला. त्यांच्या तबल्याच्या प्रत्येक ठेक्याला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला.

तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल संस्थेच्या वतीने ‘श्रध्दा सुमन’ या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पुणेकरांना जोडीवादनाची ही मेजवानी अनुभविता आली.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी पं. अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा पाचवा कार्यक्रम असणार असून कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका सुनीता आसवले यांची विशेष उपस्थिती होती.

पं. किशन महाराज यांचे शिष्य, बनारस घराण्याचे अग्रणीय वादक असलेल्या पंडित सुखविंदरसिंह नामधारी यांनी आपल्या वादनाची सुरुवात बनारस घराण्याच्या पारंपरिक वादन पद्धतीने केली. गुरुचरणी सेवा अर्पण करण्यासाठी आणि माझे गुरुबंधू पंडित अरविंद कुमार आझाद यांच्या आग्रहास्तव आज मी या कार्यक्रमाला आलो असे सांगत पंडित सुखविंदरसिंह नामधारी म्हणाले, ” पंडित किशन महाराज यांकडे तबला शिकायला मिळणे हे माझ्यासोबतच त्यांच्या सर्व शिष्यांचे भाग्य होते. मी १८-२० वर्षे त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ राहून तबला शिकलो. त्यांच्याच शिकवणूकीमुळे महाराष्ट्रात अरविंद कुमार आझाद यांनी बनारस पद्धतीने पारंपरिक तबला वादन स्थापित केले आहे. आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होत असलेला हा कार्यक्रम पाहून त्यांना योग्य आदरांजली वाहिली जात असल्याचे समाधान आहे.”

त्यांनी तीनतालाने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यांनतर त्यांनी उठान, औचार, चलन, बाट, रेला, चक्रदार परन आणि फरद यांचे दमदार प्रस्तुतीकरण केले. यांनतर त्यांनी जोडीवादन सादर केले. साडे सात इंचाच्या डग्ग्यावर कणीक लावत जोडीवादन केले जाते. धमार तालातील त्यांनी सादर केलेल्या जोडी वादनाला उपस्थितांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला. त्यांना संवादिनीवर पंडित अजय जोगळेकर यांनी समर्पक साथसंगत केली.

या आधी कार्यक्रमाची सुरुवात स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका आरती ठाकूर कुंडलकर यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग धानीने आपल्या गायन प्रस्तुतीला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालातील ‘ ए हो बनवारी गिरीधारी ओ श्याम मुरारी… ‘ ही बंदिश व द्रुत तीन तालातील ‘मोसे करत बरजोरी कुंवरकान्ह…’ ही बंदिश प्रस्तुत केली. त्यांना आदित्य देशमुख (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) तर कस्तुरी कुलकर्णी व मीनलता देशपांडे (तानपुरा) साथसंगत केली.

कार्यक्रमात डॉ. सुनील देवधर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading