Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

वसंतोत्सवमध्ये ‘दी रघु दीक्षित प्रोजेक्ट बँड’च्या तालावर रसिकांनी धरला ठेका

पुणे : कन्नड भाषेतील गीते, रघु दीक्षित व समूहाचे दमदार सादरीकरण, त्याला रसिक प्रेक्षकांनी दिलेला टाळ्यांचा प्रतिसाद आणि प्रत्येक गीतावर रसिकांनी धरलेला ठेका… १६ व्या वसंतोत्सवच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची अशी दमदार सुरुवात झाली. यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी संपन्न होत आहे. महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी रघु दीक्षित आणि समूहाचे गारूड पुणेकर रसिकांनी अनुभविले. केवळ अनुभवलेच नाही तर त्यांच्या प्रस्तुतीकरणावर लहान मोठ्या, सर्व वयोगटातील रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः ठेका धरला. गायनासोबतच सहकारी कलाकारांची बासरी, ड्रम्स, बेस गिटार व व्हायोलिनवर मिळालेली साथ यामुळे समूह सादरीकरणाचा अविस्मरणीय अनुभव पुणेकरांनी घेतला.

माझा जन्म नाशिक शहरातला मात्र नंतर जसं कळतंय तसं मी दक्षिण भारतात लहानाचा मोठा झालो, असे सांगत रघु दीक्षित म्हणाले, “पुण्यातला रसिक हा अभिजात शास्त्रीय संगीत जाणणारा जाणकार श्रोता आहे. आज प्रेक्षकांमध्ये अनेक संगीताचे जाणकार आहेत याची मला कल्पना आहे. आज आमच्या सादरीकरणासाठी शिस्तीत बसून ऐकणारा रसिक आहे यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. आज सर्वोत्कृष्ट रसिक प्रेक्षकांसमोर आम्ही सादरीकरण केले हेच आमच्यासाठी ‘जग चंगा…’ आहे.”

‘परसिवा…’ या कन्नड कवितेने रघु दीक्षित यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. ‘चंगा जग चंगा जग चंगा, अरे नंगा अरे नंगा अरे नंगा कर डाला नंगा…’ हे स्वतः रघु दीक्षित यांचे हिंदी गीत तर ‘कोडागने कोली गुंता…’ हे जग चंगा याच अल्बम मधील गीत त्यांनी सादर केले. प्रत्येकाचा प्रेमावरील विश्वास आणखी दृढ करणारे कवी नीरज यांनी रघु दीक्षित यांसाठी लिहिलेले ‘अंबर पे मिलते हैं कदमों के निशान, तेरे ही हर शाम…’ हे गीत त्यांनी गायले. ‘मन लागो फकीरी मैं…’ ही संत कबीरांची रचना, ‘गली बॉय’ या चित्रपटातील ‘ट्रेन साँग’ या नावाने सर्वपरिचित असलेले ‘जीवन जीवन दरिया दरिया…’, ‘इस दिल को संभालू कैसे…’ही गीतेही त्यांनी सादर केली.

म्हैसूर शहरातील एका सुंदर मुलीवरून शब्दबद्ध केलेले व स्वत: रघु दिखित यांनी लिहिलेले व संगीतबद्ध केलेले ‘ म्हैसूर से आयी वो…’ हे गीत डान्स मूव्ह्स सोबत सर्वांसमोर सादर करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

गौतम हेब्बार (बासरी), जोमन जेकब जोसेफ (ड्रम सेट), नरेश नेथन (बेस गिटार), राहुल राजेश मेल्लाम (पर्कशन्स), संजय कुमार व आर सीतारमण (गिटार), अक्षय गणेश (व्हायोलिन) तर ज्ञानदेव (व्हिज्युअलस्) यांनी त्यांना साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading