जिल्हास्तरीय खुली कबड्डी स्पर्धा : बारामती स्पोर्ट्स, शिवओम, चेतक स्पोर्ट्स संघांची आगेकूच
पुणे : बारामती स्पोर्ट्स, शिवओम, चेतक स्पोर्ट्स संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे अमच्युअर्स संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली.
नेहरू स्टेडीयम येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील मुलांच्या गटात चेतक स्पोर्ट्स संघाने सचिनभाऊ दोडके संघाला ३१-११ असे पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. चेतक स्पोर्ट्स संघाने मध्यंतराला १३-८ अशी आघाडी घेतली होती. चेतक संघाकडून अक्षय बोधाडे, बालाजी जाधव, आशिष पाडळे यांनी दमदार खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून विशाल धोने, मयूर कदम, आयुष मोटे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.
मुलींच्या गटात बारामती स्पोर्ट्स संघाने सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब संघाला १९-१५ असे ४ गुणांच्या फरकाने पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मध्यंतराला दोन्ही संघानी ७-७ अशी बरोबरी साधली होती. बारामती संघाकडून साक्षी काळे व आशा झाडबुके यांनी चढाया करताना तर गौरी सावंत व शीतल निंबकर यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. सुवर्णयुग संघाकडून ऐश्वर्या काळे व दीप्ती दिघे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.
मुलींच्या गटातच शिव ओम स्पोर्ट्स क्लब संघाने तिरंगा स्पोर्ट्स संघाला ३३-१३ असे २० गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला शिवओम संघाने २३-७ अशी आघाडी घेतली होती. पायल वसवे, निकिता पडवळ, तृप्ती दुर्गे यांनी विजयी संघाकडून तर संस्कृती शिंगटे व प्राची कांबळे यांनी पराभूत संघाकडून सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.
तत्पूर्वी, काल उशीरा झालेल्या मुलांच्या गटाच्या लढतींमध्ये पुणे अमच्युअर्स संघाने शाहू स्पोर्ट्स क्लब संघाना ३४-१८ असे पराभूत करताना आपली आगेकूच कायम राखली. मध्यंतराला पुणे अमच्युअर्स संघाने १६-७ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून अनिकेत उत्तेकर, वरद नवले, अभिषेक गिरी, निरंजन चौधरी यांनी तर पराभूत संघाकडून अथर्व अवचिते, प्रथमेश अडसूळ यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
मुलांच्या शिवशंभू कबड्डी संघाने रणगर्जना भोर संघाला १९-१३ असे ६ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला शिवशंभू संघाने ७-५ अशी २ गुणाची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. मनोज चव्हाण, अविनाश ढूमणे, अजय आंग्रे यांनी विजयी संघाकडून तर अक्षय चव्हाण व मनीष शेंडगे यांनी सुरेख खेळ केला.
याच गटाच्या अन्य लढतीत राणाप्रताप संघाने एसओपीएस स्पोर्ट्स क्लब संघाला ३७-१४, सतेज बाणेर संघाने एमएच स्पोर्ट्स क्लब संघाला ३९-१६, साई स्पोर्ट्स संघाने उत्कर्ष संघाला २४-२२, बदामी हौद संघाने महाराणा प्रताप शिंदेवाडी संघाला २३-१४ असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
मुलींच्या गटात झालेल्या लढतींमध्ये राजमाता जिजाऊ ब संघाने लोणकर माध्यमिक विद्यालय संघाला २४-२२ असे २ गुणांच्या फरकाने तर द्रोणा स्पोर्ट्स संघाने जागृती प्रतिष्ठान संघाला ४८-३० असे १८ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
