पुण्यासह कोल्हापूर, तळोजा, अमरावती, नागपूर, नाशिक कारागृहाचा संघ महाअंतिम फेरीत
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक मध्यवर्ती कारागृह या संघांची प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत राज्यातील 29 कारांगृहांमधील बंदीजन सहभागी झाले होते.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवाचे निमित्त साधून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा
सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा
हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन एकविध
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या याच अभंगाप्रमाणे अध्यात्मातून प्रबोधन आणि प्रबोधनातून मतपरिवर्तन या एकमेव उद्देशाने राज्यातील कारांगृहांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 29 संघांमधून अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पुण्यात रंगणार आहे. बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि अहमदनगर जिल्हा कारागृह या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धेत सहभागी बंदीजनांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महाअंतिम स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय संघास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या कारागृहांना सौ. दिना व प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्वर्गीय कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ 100 पुस्तकांचा संच, हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
