Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर आणि प्रशियाचा राजा फ्रेडरिक दुसरा यांच्यातील पत्र संवादाचे अभिवाचन

पुणे  पुण्यातील तरुणांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्याच्या उद्देशाने अलियान्स फ्राँसेज आणि ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन यांच्यातर्फे एका अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बोट क्लब रस्ता येथील ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमात आंनद चाबुकस्वार आणि अंगद पटवर्धन हे फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर आणि प्रशियाचा राजा फ्रेडरिक दुसरा यांच्यात झालेल्या पत्रसंवादातील काही महत्वपूर्ण भागांचे अभिवाचन करतील. ऑफ फिलोसॉफर्स अँड किंग्ज असे या कार्यक्रमाचे नाव आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी www.tickitkhidakee.com संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.

१७ व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर आणि प्रशियाचा राजा फ्रेडरिक दुसरा यांच्यात तब्बल ४० वर्षांमध्ये झालेल्या पत्रसंवादातील काही महत्वपूर्ण भागांचे नाट्यवाचन या कार्यक्रमादरम्यान होणार आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रांस – जर्मनी या दोन देशांत मैत्रीचा आणि सहकार्याचा पाया रचणाऱ्या ‘एलिझे’ करारास २०२३ साली ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या कराराच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, याचे संपूर्ण सादरीकरण इंग्रजी भाषेतून होणार आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती रेनबो अंब्रेला फाउंडेशन यांनी केली आहे. तर कार्यक्रमाचे लेखन डॉ. नंदिता वागळे यांनी  व दिग्दर्शन अनुपम बर्वे यांनी केले आहे.

याबाबत अलियान्स फ्राँसेज पुणे’च्या संचालिका अमेली विगेल म्हणाल्या, “अलीकडच्या काळात, फ्रान्स आणि जर्मनी हे देश युरोपियन युनियन’च्या एकीकरणासाठीचे  सर्वात उत्साही समर्थक आहेत. काही वेळा त्यांचे वर्णन  “ट्विन इंजिन”  म्हणून केले जाते. ग्योथं -इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूल्लर भवन,पुणे आणि अलियॉन्स फ्राँसेज, पुणे या संस्थांनीदेखील ट्विन इंजिनाप्रमाणे कार्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.”

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन’च्या संचालिका मिरीयम ब्रुन्स म्हणाल्या, “ मैत्री ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आम्ही विविध उपक्रम आयोजित करणार असून, पुण्यातील स्थानिक कलात्मक, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याचे आमचे प्रयत्न असतील.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading