विद्यापीठाच्या निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत 80 टक्के मतदान
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्यापरिषदेसाठी शिक्षकांमधून निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत आज विक्रमी 80 टक्के मतदान झाले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिक येथील एकूण 45 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षक मतदारांमधून एकूण दहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी तसेच विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर एकूण सहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आणि विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर महाविद्यालयाच्या विभाग प्रमुखांमधून तीन विभाग प्रमुख निवडून देण्यासाठी आज या निवडणुका पार पडल्या या निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठाचे दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून राबवण्यात आली. रविवारी सकाळी दहा वाजलेपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रासह सर्व केंद्रावर मोठा उत्साह होता आणि मोठ्या प्रमाणात मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळासाठी च्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर घेण्यात येणारी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे अतिशय चुरशीची आणि औत्सुक्याची बाब होती. आता विद्यापरिषदेवर आणि अधिसभेवर शिक्षकांमधून कोण विजयी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विद्यापीठाच्या आवारात सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे 300 अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
आजच्या या निवडणुकीत तीनही जिल्ह्यात झालेली मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे सोबत जोडली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आणि विद्यापरिषदेसाठी तसेच अभ्यास मंडळांसाठी शिक्षकांमधून प्रतिनिधी देण्यासाठी निवडणुका आज अतिशय शांततेत पार पडल्या. सर्व केंद्रप्रमुख त्यांच्या संस्थांचे संस्थाचालक विद्यापीठाचे शिक्षक अधिकारी कर्मचारी यांनी या निवडणुका यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले आहेत. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सर्व उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे देखील मी आभार मानतो. माननीय कुलगुरू व माननीय कुलगुरू यांचे मोलाचे मार्गदर्शन या निवडणुकीसाठी लाभले त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.
— डॉ. प्रफुल्ल पवार कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी
